नेरळ-कळंब रस्ता अर्धवट, ठेकेदार गेला पळून
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:04 IST2019-07-15T00:04:19+5:302019-07-15T00:04:26+5:30
माथेरान-नेरळ-पोही या राज्यमार्ग रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण काम मंजूर होते.

नेरळ-कळंब रस्ता अर्धवट, ठेकेदार गेला पळून
- कांता हाबळे
नेरळ : माथेरान-नेरळ-पोही या राज्यमार्ग रस्त्यावर डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण काम मंजूर होते. त्यातील डांबरीकरण काम पूर्ण करून ठेकेदाराने काम सोडून पळ काढला आहे, त्यामुळे वाहनचालकांचे हाल सुरू असून प्रचंड खड्ड्यांमुळे नेरळ रेल्वे गेटपासून साई मंदिरपर्यंतच्या रस्त्याचे अंतर पार करायला जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी शनिवारी पाहणी केली असून लवकरच या रस्त्यावर खड्डे भरण्याची आशा निर्माण झाली आहे.
माथेरान-नेरळ-पोही पुढे मुरबाडकडे जाणाऱ्या रस्त्याचे नेरळ भागातील रुंदीकरण तसेच रुंदीकरण केलेल्या भागात डांबरीकरण आणि साईमंदिर भागात काँक्रीटीकरण हे काम ठेकेदाराने सुरूच केले नाही. या रस्त्यावरील धामोतेपासून पोहीपर्यंत असलेली डांबरीकरण कामे मार्चमध्येच पूर्ण करून ठेकेदार कंपनी कामे अर्धवट टाकून निघून गेली आहे. या रस्त्याच्या कामासाठी २०१८ च्या अर्थसंकल्पात सव्वातीन कोटी रुपयांची तरतूद होती. त्यात पोहीपासून धामोतेपर्यंत डांबरीकरण त्यात काही भागात खडीकरण करून डांबरीकरण ही कामे अंतर्भूत होती. त्यानंतर नेरळ साईमंदिर परिसरात असलेली दुकाने लक्षात घेऊन तेथील रस्त्याचा २०० मीटरचा भाग काँक्रीटीकरण काम अंतर्भूत होते. त्याशिवाय गणेश स्वीटपासून नेरळ रेल्वे गेट या भागात रस्त्याचे रुंदीकरण आणि त्यानंतर डांबरीकरण ही कामे अंतर्भूत होती.
मात्र, ठेकेदार कंपनीने पोहीपासून धोमोतेपर्यंत डांबरीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील दोन्ही कामे केली नाहीत, त्यातील रेल्वे गेटपासून पुढे रस्त्याची रुंदी कमी असल्याने त्या ठिकाणी साइडपट्टी वाढवून त्यानंतर डांबरीकरण केले जाणार होते, त्यासाठी उन्हाळ्यात तीन महिन्यांचा कालावधी असतानाही ठेकेदार कंपनीने फक्त गंमत बघण्याचे काम केले आहे. त्याच काळात रेल्वे गेटच्या पलीकडे नेरळ ग्रामपंचायतीमधील रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम करण्यासाठी पूर्ण रस्ता तब्बल सव्वा महिना बंद होता.
या काळात ठेकेदाराला रुंदीकरण आणि डांबरीकरण ही दोन्ही कामे सहज करता आली असती. मात्र, ठेकेदाराने वाहनचालकांना त्रास देण्यासाठी ती कामे केली नाहीत. त्याच वेळी सिमेंट काँक्रीटच्या कामाकडेही कानाडोळा करून कामे सुरूच केली नाहीत.
>नेरळ भागात रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण कामे करावीत यासाठी ठेकेदार कंपनीला पत्र देऊन सूचित केले होते. त्याच वेळी वरिष्ठांनाही सूचित केले होते. मात्र, ठेकेदार कंपनीने ऐकले नसल्याने आता लोकांचे बोल आम्हाला ऐकावे लागत आहेत, त्यामुळे कामे अर्धवट ठेवणाºया ठेकेदारावर कारवाईची प्रक्रिया आम्ही सुरू करणार आहोत.
- अजयकुमार सर्वगोड, उपअभियंता, बांधकाम विभाग
>डांबरीकरण होऊनही रस्ता सपाट झालेला नाही, तर मुख्य खड्डे ज्या भागात आहेत तेथील कामेदेखील सुरू करण्यात आली नाहीत. त्यामुळे आम्हाला रिक्षा चालविणेही कठीण होऊन गेले असून कामे अर्धवट ठेवून लोकांचे हाल करणाºया ठेकेदाराला शासनाने काळ्या यादीत टाकावे.
- श्रावण जाधव, अध्यक्ष, जय भवानी रिक्षा संघटना
>वाहनचालकांची कसरत
रस्त्याचे सव्वातीन कोटींचे काम मिळविणारा ठेकेदार याचा कामचुकारपणा आणि त्यावर गप्प बसणारे सार्वजनिक बांधकाम विभाग यामुळे जनतेचे हाल सुरू आहेत. रस्त्यावर नेरळ रेल्वे गेटपासून साईमंदिर या भागात रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहनचालकांची कसरत सुरू आहे.
त्यातच रस्त्याच्या एका बाजूला साचून राहत असलेले पाणी बाहेर पडत नसल्याने ते पाणी रस्त्यावर जाम होत असताना पूर्वीच्या पाइप, मोºया यांना मोकळी वाट करून देण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग पार पाडत नाही.
त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येत दररोज वाढ होत असून रस्त्यावरील पाणी, बाजूला असलेले पाणी गटारात वाहून जात नाही. मात्र, त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा ठेका घेणाºया सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन या कंपनीला नोटिसा बजावल्या आहेत.
मात्र, ठेका घेणारे ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाला जुमानत नाहीत, त्यामुळे लोकांना खड्ड्यांतून जावे लागत असून या खड्ड्यांतील पाणी लोकांच्या अंगावर उडत असून मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर भरावे, अशी मागणी केली जात आहे.