मानगड किल्ल्यावर सोयीसुविधांची गरज; पर्यटकांच्या संख्येत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 12:09 AM2020-01-13T00:09:30+5:302020-01-13T00:09:41+5:30

गडावरील प्राचीन अवशेषांचे जतन करण्याची मागणी

The need for facilities at the Manghad Fort; An increase in the number of tourists | मानगड किल्ल्यावर सोयीसुविधांची गरज; पर्यटकांच्या संख्येत वाढ

मानगड किल्ल्यावर सोयीसुविधांची गरज; पर्यटकांच्या संख्येत वाढ

Next

गिरीश गोरेगावकर 

माणगाव : रायगडचा उपदुर्ग अशी ओळख असलेल्या किल्ले मानगडावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गडपायथ्याशी तसेच गडावर मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यात याव्यात, अशी मागणी बोरवाडी परिसरातून होत आहे.
निजामपूर रायगड मुख्य रस्त्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मानगड ऐतिहासिक अवशेषांनी संपन्न असल्याचे दिसून येते. गडावर पाण्याचे टाके, राजसदर, दिंडीदरवाजा, दोन भक्कम बुरूज, किल्लेदारांच्या वाड्याचे अवशेष, प्राचीन लेणी असे पुरावे शेष आढळून येतात. राजधानी रायगडकडे येणारे मुंबई-पुण्याकडील पर्यटक आवर्जून येत असतात. काही पर्यटक तर रात्री मुक्कामालाही असतात. शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीही येऊ लागल्या आहेत; परंतु सोयीसुविधांचा अभाव असल्याने पर्यटक नाराज होत असतात, म्हणूनच मानगडवाडी गावात सुसज्ज पर्यटक निवास, वाहनतळ पार्किंगची व्यवस्था, मानगडवाडीपासून इंजाई मंदिरापर्यंत विद्युत पथदिव्यांची सोय अशा सोयीसुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे.

‘किल्ल्याला ‘क’ दर्जा पर्यटनस्थळ घोषित करा’
किल्ल्यावर मागील दहा वर्षांपासून दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई ही संस्था गडसंवर्धनाचे कार्य स्वखर्चाने करत आहे.
संस्थेने आजपर्यंत दिशादर्शक फलक, तटबंदी, डागडुजी, पाणीटाक्यांची स्वच्छता, न्हाणवा मोहीम तसेच टोटल स्टेशन सर्व्हेसारख्या अत्याधुनिक मोजणी तंत्राचा वापर करून गडाचा नकाशा रेखाटन, वास्तुनिश्चिती करण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे.
बोरवाडी परिसरातील या किल्ल्याला ‘क’ दर्जा पर्यटनस्थळ घोषित करण्यात यावे, तसेच मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

राज्य संरक्षित स्मारक घोषित
1.शिवकाळात लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या मानगडाचा रायगड प्राधिकरणामध्ये समावेश केल्यास तातडीने निधीचा विनियोग करता येईल, असे मत इतिहास अभ्यासक रामजी कदम यांनी व्यक्त केले आहे.
2. शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्यविभागाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराणवास्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६० नुसार १६ सप्टेंबर २०१६ रोजी मानगड किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारक घोषित केले आहे.


3.तसेच अंतिम अधिसूचनेनुसार मौजे मशिदवाडी येथील ६.६९ हेक्टर क्षेत्रफळ संरक्षित करण्याविषयी राजपत्रात प्रसिद्धी करण्यात आली आहे.
4. याच परिसरात भव्य शिवमंदिराचे भग्नावशेष, वीरगळ, सतीशिळा, समाधीशिळा, देवदेवतांची शिल्पे आदी अवशेष आहेत. त्यांचे जतन होण्यासाठी गावात वस्तुसंग्रहालय इमारत होणे गरजेचे आहे.

Web Title: The need for facilities at the Manghad Fort; An increase in the number of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.