हागणदारीमुक्तीसाठी पालिका सज्ज
By Admin | Updated: August 9, 2015 23:20 IST2015-08-09T23:20:29+5:302015-08-09T23:20:29+5:30
शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे.

हागणदारीमुक्तीसाठी पालिका सज्ज
पनवेल : शहर हागणदारीमुक्त करण्याकरिता पालिकेने ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानात भाग घेतला आहे. त्या अंतर्गत शौचालये बांधण्याकरिता अर्ज भरून घेण्याचे काम सुरू आहे. या व्यतिरिक्त पालिकेकडून उघड्यावर बसणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याकरिता आता गुड मॉर्निंग पथक नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सोमवारी त्या संदर्भात संपूर्ण नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
अ वर्ग नगरपालिका असलेल्या पनवेल शहरातील वाड्यांची जागा इमारतींनी घेतली आहे. टोलेजंग इमारतीत लोकवस्ती वाढत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय प्रकल्प येत असल्याने पनवेलकडे लोंढेच लोंढे येत आहेत. त्यामध्ये परजिल्हे आणि इतर राज्यातून येणाऱ्या कामगारांची संख्याही सर्वाधिक असते. बिगारी काम करणाऱ्या या कामगारांना राहण्याकरिता घर मिळत नाही. भाड्याने घर घेणे त्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने मिळेल त्या जागेवर झोपड्या करून राहण्याकडे त्यांचा कल अधिक आहे. पनवेल शहरात लक्ष्मी वसाहत, नवनाथ नगर, वाल्मीकीनगर, मालधक्का, लोखंडीपाडा या ठिकाणी झोपडपट्ट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्या ठिकाणी नगरपालिकेने पाण्याची सोय केली असली तरी सांडपाण्याची व्यवस्था त्याचबरोबर शौचालयाची अपुरी संख्या आहे. काही झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असली तरी ती पर्याप्त लोकवस्तीला अपुरी आहे. कित्येक झोपडपट्ट्यांमध्ये शौचालये नसल्याने ते प्रातर्विधी उघड्यावर उरकतात. त्यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडून दुर्गंधी निर्माण होते. या व्यतिरिक्त डासांची निर्मिती होऊन रोगराई सुध्दा पसरते.
एकीकडे पनवेल शहर स्वच्छ आणि सुंदर करण्याकरिता पालिका प्रशासन अधिक परिश्रम घेत आहे. मात्र उघड्यावर बसणाऱ्यांमुळे स्वच्छतेचा बोजवारा उडत असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पनवेल नगरपालिकेने स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन त्यामाध्यमातून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या दृष्टीनेही पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. (वार्ताहर)