तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 22:52 IST2019-12-13T22:49:21+5:302019-12-13T22:52:50+5:30
अतिरिक्त कारभार महाडचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याने पोलादपूरमधील कामकाज थंडावले आहे.

तहसीलदारांच्या आश्वासनानंतर मनसेचे आंदोलन स्थगित
पोलादपूर : नगरपंचायतीच्या पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन सहाव्या दिवशी स्थगित करण्यात आले. पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई यांनी शासकीय पातळीवर पाठपुरावा करून पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे लेखी आश्वासन दिल्याने मनसेने शुक्रवारी दुपारी ४.१५ वाजण्याच्या सुमारास आंदोलन स्थगित केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पोलादपूरने पोलादपूर नगरपंचायतीसाठी पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळण्यासाठी पुकारलेल्या बेमुदत धरणे आंदोलनासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी मनसे कोकण संघटक वैभव खेडेकर, रायगड जिल्हाध्यक्ष देवेंद्र गायकवाड, उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर आदीनी पोलादपूर नगरपंचायत येथे बुधवारी ११ डिसेंबर २०१९ रोजी भेट दिली. या वेळी सविस्तर चर्चा केली.
पोलादपूर ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली असून, तीन वर्षांपासून नगरपंचायतचा कारभार कधी पोलादपूरचे मुख्याधिकारी यांच्या मार्फ त तर कधी अतिरिक्त कारभार महाडचे मुख्याधिकारी यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याने पोलादपूरमधील कामकाज थंडावले आहे. याच पार्श्वभूमीवर पोलादपूर मनसेतर्फे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते.