म्हसळा एसटी डेपोचा कारभार रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 23:36 IST2019-05-31T23:35:59+5:302019-05-31T23:36:24+5:30
प्रवाशांमध्ये नाराजी : वाहतूक नियंत्रकाची उडवाउडवीची उत्तरे; वेळापत्रकही कोलमडले

म्हसळा एसटी डेपोचा कारभार रामभरोसे
म्हसळा : रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या रामवाडी, पेण विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या श्रीवर्धन आगाराच्या अखत्यारीतील म्हसळा बसस्थानकातील सावळा गोंधळामुळे प्रवाशांमधून नाराजी व्यक्त होत आहे. श्रीवर्धन आगार व्यवस्थापकांचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्याने म्हसळा एसटी डेपोचा कारभार रामभरोसे असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून व्यक्त होत आहेत.
श्रीवर्धन आगार व्यवस्थापक, म्हसळा वाहतूक नियंत्रक, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्या हलगर्जीपणामुळे बस उशिरा सुटणे, वेळापत्रकात बदल असे प्रकार वारंवार सुरू असतात. याबाबत अनेक वेळा प्रवाशांनी राज्य परिवहन महामंडळच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. गुरुवार, ३० मे रोजी श्रीवर्धन आगारातून सुटणाऱ्या मुंबई व बोरीवली ही गाडी उशिरा होती. याशिवाय आगारातून सुटणाºया स्थानिक गाड्याही उशिराने धावत होत्या. याबाबत आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी याबाबत विचारणा केली असता, वाहतूक नियंत्रक रमेश गोरेगावकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. इतकेच नव्हे तर तक्रारवही देण्यासही नकार दिला. प्रवाशांनी कर्तव्यात कसूर करणाºया कर्मचाºयांवर कारवाईची मागणी केली आहे.
सकाळी १०.३० पासून मुलांसह बसस्थानकात गाडीची वाट पाहत आहे; परंतु दुपारी २ वाजले तरी गाडी आली नाही याबाबत विचारणा केली असता, नियंत्रकाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. - महिला प्रवासी, म्हसळा
म्हसळा बसस्थानकात घडलेल्या प्रकाराची संपूर्ण माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल - रेश्मा गाडेकर,
व्यवस्थापक, श्रीवर्धन आगार