मेट्रो ठरणार किफायतशीर
By Admin | Updated: May 20, 2014 02:43 IST2014-05-20T02:43:34+5:302014-05-20T02:43:34+5:30
मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे.
_ns.jpg)
मेट्रो ठरणार किफायतशीर
मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणार्या मेट्रो रेल्वेचे भाडे नक्की किती असणार, यावर चर्चा रंगली असतानाच विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो रेल्वेचे भाडे कमीत कमी १० रुपये आणि अधिकाधिक ४० रुपये असणार आहे. शिवाय रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्याच्या तुलनेसह प्रवासासाठी लागणार्या वेळेच्या तुलनेतही मेट्रो रेल्वे मुंबईकरांना परवडणार आहे. मुंबई मेट्रो रुळावर येण्यासाठी आता केवळ रेल्वे बोर्डाच्या मंजुरीची आवश्यकता आहे. आणि ही मंजुरी पुढील काही दिवसांत कधीही मिळण्याची शक्यता मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) ने वर्तवली आहे. मात्र मेट्रोच्या भाड्याहून उफाळून आलेला वाद अद्याप शमलेला नाही. कारण राज्य सरकारने यावर अळीमिळी गुपचिळी साधली असून, लोकप्रतिनिधींनी मेट्रोच्या भाड्याच्या मुद्द्यांवर आवाज उठवत ब्र उच्चारला आहे. शिवाय मेट्रोचे भाडे कमी ठेवण्याचे आवाहन केले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रोचे भाडे किमान प्रथमत: ठरविण्याचा अधिकार हा मेट्रो रेल्वे प्रशासनाला आहे. आणि सध्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रशासन आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्र सरकारने राज्य सरकारच्या शहर विकास विभागाला धाडलेल्या पत्रात हा मुद्दा नमूद करण्यात आला आहे. मेट्रोचे भाडे ठरविण्यासाठीच्या समितीवर उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आणि राज्य व केंद्र सरकारचा अधिकारी यांचाही समावेश असणार आहे. शिवाय मेट्रोचे भाडे ठरविताना डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) याचाही प्रामुख्याने अभ्यास केला जाणार आहे, अशी माहिती एमएमओपीएलच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)