माथेरानकर तीन दिवस पाण्याविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 12:31 AM2020-08-12T00:31:16+5:302020-08-12T00:31:30+5:30

यंत्रसामुग्री, जनरेटरची दुरवस्था

Matherankar without water for three days | माथेरानकर तीन दिवस पाण्याविना

माथेरानकर तीन दिवस पाण्याविना

Next

माथेरान : रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त पावसाची नोंद असलेले माथेरानकरांना तीन दिवस पिण्याच्या पाण्याविना काढावे लागल्याने येथील जल प्राधिकरणाच्या कारभाराविषयी सर्वत्र रोष व्यक्त केला जात आहे.

माथेरान पर्यटन नगरीस येथील शार्लोट लेक येथून पाणीपुरवठा होत असतो. मात्र, मागील काही वर्षांमध्ये येथे झपाट्याने पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने हे पाणी कमी पडू लागले होते. त्याकरिता नेरळ येथील उल्हासनदीचे पाणी पंपांद्वारे माथेरानपर्यंत नेऊन पाणीटंचाईवर मात करण्यात आली. मात्र, हे पाणी नेताना माथेरान येथील शार्लोट लेक येथील पम्पिंग स्टेशनकडे प्राधिकरणाने दुर्लक्ष केले. पूर्वी येथे वीज नसली, तरी जनरेटरच्या साहाय्याने पाणी पम्पिंग करून सर्वत्र वितरित केले जात होते. मात्र, नेरळहून येणारे पाणी येथील जलशुद्धीकरण केंद्रात येऊ लागल्याने शार्लोट लेक येथील कार्यालय बंद पडू लागले. त्याच्यामुळे येथे असलेली यंत्रसामुग्री व जनरेटरच्या देखरेखीकडे दुर्लक्ष झाल्याने येथील एक-एक सुविधा बंद होऊ लागल्या, ज्याचे विपरित परिणाम आता माथेरानकरांना भोगावे लागत आहेत.

नेरळ येथील पाणीपुरवठा खंडित झाल्यास व शार्लोट लेक येथील वीज अनियमित झाल्यास माथेरानकरांना पिण्याच्या पाण्यास मुकावे लागते. येथील लाखो रुपयांचे जनरेटर वापराविना गंजले आहेत. जिल्ह्यात सर्वात जास्त पाणीबिल माथेरानमध्येच आकारले जाते, तरीही अनेक वेळा वीज नसली की येथील पाणीपुरवठा खंडित होत असतो, असे वर्षातून दोन-तीन वेळा होत असते. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यास जल प्राधिकरण अपयशी ठरले आहे.
माथेरानमध्ये व्यावसायिक व घरगुती अशा जवळपास तेराशे नळजोडण्या आहेत. त्याचे मासिक उत्पन्न सरासरी वीस लाखांच्या आसपास होते. म्हणजे जोडण्यांच्या हिशोबाने येथे उत्पन्न जास्त आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतन पाच-सहा लाख पकडले, तरी जल प्राधिकरणाकडे मोठी रक्कम उरत आहे. मात्र, नेरळ ते माथेरानदरम्यान असलेली मोठी पम्पिंग स्टेशन व त्याला लागणारी वीज देयकांची रक्कम बारा लाखांच्या आसपास आहे. त्यामुळेच ही पाणी योजना माथेरानकरांना महाग पडत आहे. जल प्राधिकरण ही विजेची बिले माथेरानकरांकडून जादा भाडे लावून वसूल करीत आहे व याच पम्पिंग स्टेशनवरून अनेक पाणीजोडण्या देण्यात आल्या आहेत, त्यांना मात्र त्यात सूट मिळत आहे, तसेच शासनाकडून वीजबिलामध्ये सवलत मिळण्यासाठी प्रयत्न न करता माथेरानकरांना वेठीस धरले जात आहे. इतके करूनही माथेरानकरांना मात्र दिलासा नाहीच पाणी बिले भरण्यास विलंब झाल्यास पाणीजोडणी कापल्या जातात.

जनरेटरच्या दुरुस्तीची मागणी
मागील तीन दिवसांपूर्वी जमिनीखालून गेलेल्या वीजवाहिनी खराब झाल्याने शार्लोट लेक येथील पम्पिंग स्टेशन बंद पडले, तर याच दरम्यान जुम्मापट्टी येथील नेरळ येथून होणारी पम्पिंग स्टेशनमधील पंपमध्ये बिघाड झाल्याने, माथेरानकरांना होणारा पाणीपुरवठा खंडित झाला होता.
येथील मर्यादित मालवाहतूक व्यवस्था लक्षात घेता, हा पुरवठा पूर्ववत करण्यास उशीर लागला. त्यामुळे भरपावसात माथेरानकरांचे पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले होते. येथील कर्मचारी मर्यादित सुविधांच्या आधारे नागरिकांना सुविधा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र, यांत्रिक आघाडीवर साथ मिळत नसल्याने त्यांचा नाईलाज होत आहे.

अजूनही शार्लोट लेक येथील वीजपुरवठा सुरू झालेला नसून, नेरळ येथून येणारे पाणी जल प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसरात्र काम करून सुरू केल्याने, मंगळवारी तीन दिवसांनंतर माथेरानकरांना दिलासा मिळाला आहे. जनरेटरची दुरुस्ती व्हावी किंवा नवीन जनरेटर बसविण्यात यावेत.

Web Title: Matherankar without water for three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.