खालापूर तालुक्यात साजगाव येथे केमिकल कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, तर ८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 17:21 IST2020-11-05T17:21:30+5:302020-11-05T17:21:39+5:30

पाच किलोमीटर परिसरात ऐकायला आला स्फोटाचा आवाज

Massive explosion at a chemical company at Sajgaon in Khalapur taluka; 2 killed, 8 injured | खालापूर तालुक्यात साजगाव येथे केमिकल कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, तर ८ जखमी

खालापूर तालुक्यात साजगाव येथे केमिकल कंपनीत भीषण स्फोट; २ जणांचा मृत्यू, तर ८ जखमी

खोपोली- खालापूर तालुक्यातील साजगांव जवळील आरकोस इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये असलेल्या जसनव्हा केमिकल कंपनीत पहाटे ३ च्या सुमारास झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटामुळे परिसरातील चार ते पाच कंपन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या भीषण दुर्घटनेमध्ये विष्णाई कृष्णा लुबाने (३५) या महिलेचा आणि अन्वर रजाक खान (४८) या दोघांचा मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत.

स्फोटाचा आवाज एवढा प्रचंड होता की पाच किमी परिसरामध्ये तो ऐकायला आला आणि त्यामुळे अनेक घरांना तडे गेले, खिडक्यांच्या काचा फुटल्या गेल्या.    स्फोटामुळे लागलेल्या आगीने रौद्ररूप घेतले होते.आठ ते दहा बंबांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर पाच ते सहा तासांनी आग आटोक्यात आली. घटनेचे वृत्त समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, विभागीय पोलिस अधीक्षक संजय शुक्ला, खोपोलीचे पोलीस निरीक्षक धनाजी शिरसागर, अमोल वळसंग, श्रीरंग किसवे, प्रांत वैशाली परदेशी, तहसीलदार चपलवार, 'अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी ' या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ साटेलकर व त्यांचे सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून परिसरातील लोकांना अमोनियाचा वास येत होता तसेच डोळे चुरचुरण्याचा त्रासही होत होता. काही ग्रामस्थांनी याबाबत कंपनीकडे तक्रारही केली होती.आरकोस इंडस्ट्रियल इस्टेटच्या पदाधिकाऱ्यांनीही कारखान्याच्या मालकाला याबाबत कळवले होते. रिअॅक्टर मध्ये काहीतरी बिघाड झाला होता. पहाटे १.३० च्या सुमारास बॅचचे तापमान वाढायला लागले. रिॲक्टरही व्हायब्रेट व्हायला लागला होता.त्यामुळे कामगार तेथून बाहेर पडले. परंतु दुर्दैवाने बाजूलाच राहत असलेल्या कुटुंबातील विष्णाई लुबाने यांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तसेच समोरच्या कंपनीतील अन्वर खान या वॉचमनच्या डोक्यावर शेडचा पत्रा पडल्यामुळे तो ही यामध्ये मरण पावल्याची माहिती स्थानिकांनी दिली. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ तसेच फॅक्टरी इन्स्पेक्टर यांनी तातडीने या घटनेची नोंद घेऊन परिसरामधील अन्य धोकादायक कंपन्यांचीही तपासणी करणे गरजेचे आहे.

Web Title: Massive explosion at a chemical company at Sajgaon in Khalapur taluka; 2 killed, 8 injured