गोंदाव येथे एसटीला अपघात, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 23:45 IST2019-02-12T23:45:16+5:302019-02-12T23:45:24+5:30
सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील विद्यार्थ्यांना जांभूळ पाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या शाळेत आणताना कर्जत डेपोच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला.

गोंदाव येथे एसटीला अपघात, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली
पाली : सुधागड तालुक्यातील गोंदाव येथील विद्यार्थ्यांना जांभूळ पाडा येथील आत्मोन्नती विद्यामंदिर या शाळेत आणताना कर्जत डेपोच्या एसटीचा तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने अपघात झाला. या वेळी चालकाने दाखविलेल्या प्रसंगावधाने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती चालक सानप यांनी दिली
मंगळवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास गोंदाव येथून विद्यार्थी घेऊन ही एसटी निघाली असताना साधारण ९ ते ९.१५ दरम्यान कासईशेत गावाच्या तीव्र उतारावर एसटीचा डावीकडील ब्रेक फेल झाल्याचे चालकाच्या लक्षात आल्यावर प्रसंगावधान राखून चालकाने पुढील तीव्र उताराचे वळण न मारता सरळ बस रस्त्याच्या समोरील बाजूला असलेल्या चारित उतरवली. त्यामुळे बसचे दोन्ही चाक खड्ड्यात गेल्याने आतील विद्यार्थ्यांना जोराचा झटका बसला; परंतु यात कोणालाही मार लागला नाही. सर्व विद्यार्थी सुखरूप बचावले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या बसमध्ये १४ विद्यार्थी व तीन प्रवासी होते. एसटीचा अपघात झाल्याचे समजताच पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त एसटीला काढण्यासाठी गोंदाव येथील रमेश पाठारे यांचा जेसीबी व किशोर पाठारे यांनी साखळ दंड आणून चालक व वाहक यांना मदत केली. मानव विकासच्या एसटी तालुक्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करत असतात. ग्रामीण भागात डोंगराळ व तीव्र उताराचे रस्ते आहेत, अशा ठिकाणी एसटी पाठविताना डेपोकडून योग्य काळजी घेतली जात नाही, असे मत पालकांनी या वेळी व्यक्त केले. या एसटी बसची देखभाल दुरु स्ती, टायर आणि आतील स्वच्छता या बाबीकडे दुर्लक्ष केले जाते.
चौकशीनंतर समजेल अपघाताचे कारण - यादव
कर्जत डेपो मॅनेजर यादव म्हणाले की, सुधागड तालुक्यात हा अपघात घडला असल्याने ते पेण डेपोच्या अंतर्गत येते. पेण डेपोचे मॅनेजर घटनास्थळी निघाले असून त्याची चौकशी केल्यावर अपघाताचे कारण समजू शकेल.
गाडीच्या देखभाल दुरुस्ती व टायर आणि स्वच्छता याबद्दल त्यांनी सर्व सकारात्मक उत्तरे दिली जर देखभाल होत असेल तर गाडीचे ब्रेक फेल कसे झाले याबद्दल मात्र त्यांनी तांत्रिक बाब असल्याचे सांगितले.