खासदार, आमदारांनी गमावले बालेकिल्ले; मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील गड राखण्यात यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 09:42 IST2025-12-22T09:41:42+5:302025-12-22T09:42:42+5:30
Maharashtra Nagar Parishad Election Results: मतदानादिवशी रोहा, महाडमध्ये राडा झाल्याने पोलिसांनी जादा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, मतमोजणी शांततेत पार पडली.

खासदार, आमदारांनी गमावले बालेकिल्ले; मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील गड राखण्यात यशस्वी
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील १० नगरपालिकांच्या निवडणुकीत काहींनी गड राखले, तर काहींच्या हातून निसटले. खरी लढत ही अजित पवार गट आणि शिंदेसेनेत होती. दोन्ही पक्षांकडे तीन-तीन नगरपालिका आल्या असल्या, तरी दोन्ही पक्षांच्या हातून बालेकिल्ल्यातील नगरपालिका निसटल्या आहेत. खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेश बालदी यांनी बालेकिल्ले गमावले, तर मंत्री भरत गोगावले, आमदार रवींद्र पाटील यांनी आपला गड राखला आहे.
मतदानादिवशी रोहा, महाडमध्ये राडा झाल्याने पोलिसांनी जादा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, मतमोजणी शांततेत पार पडली. रायगड जिल्ह्यात महाड, माथेरान आणि खोपोली नगरपालिकेवर शिंदेसेना, रोहा, मुरुड आणि कर्जत नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची सत्ता आली आहे. अलिबाग नगरपालिकेवर शेकाप, काँग्रेस आघाडी, पेण भाजप, उरण महाविकास आघाडी, तर श्रीवर्धनमध्ये उद्धवसेनेने नगरपालिकेवर सत्ता काबीज केली आहे.
खा. सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांना आपल्या बालेकिल्ल्यात उद्धवसेनेने धक्का पोहोचवला. उद्धवसेनेचे अतुल चौगुले यांनी अजित पवार गटाचे जितेंद्र सातनाक यांचा २१९ मतांनी पराभव केला आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरुड आणि रोहा नगरपालिकेवर विशेष लक्ष दिले होते. तेथे अजित पवार गटाने झेंडा फडकविला आहे. महेंद्र दळवी यांना तटकरे यांनी झटका दिला.
मतदासंघातील गणिते अशी
कर्जत मतदारसंघात खोपोली आणि माथेरान नगरपालिकेवर भगवा फडकविण्यात आमदार महेंद्र थोरवे यशस्वी झाले आहेत. मात्र, कर्जत नगरपरिषद राखण्यात अपयश आले. भाजपचे माजी आमदार सुरेश लाड यांची सूनबाई स्वाती लाड यांचा अजित पवार गटाच्या पुष्पा दगडे यांनी पराभव केला.
पेण मतदारसंघातील पेण नगरपालिका राखण्यात आमदार रवींद्र पाटील यशस्वी झाले आहेत. त्यांच्या सूनबाई प्रीतम पाटील या दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.
उरण नगरपालिकेमध्ये आमदार महेश बालदी यांना महाविकास आघाडीने झटका दिला आहे. शरद पवार गटाच्या भावना घाणेकर यांनी भाजपच्या शोभा कोळी यांचा पराभव केला.