टक्केवारीच्या मोहापायी सत्ताधारी ‘वॅपकॉस’च्या प्रेमात
By Admin | Updated: August 7, 2015 01:28 IST2015-08-07T01:28:50+5:302015-08-07T01:28:50+5:30
जलवाहिनी बदलण्याचा तांत्रिक सल्ला १५ कोटींच्या घरात.

टक्केवारीच्या मोहापायी सत्ताधारी ‘वॅपकॉस’च्या प्रेमात
अकोला : महान ते अकोला शहरापर्यंतची मुख्य जलवाहिनी तसेच संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलण्यासाठी निधी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ‘पीएमसी’ नियुक्त करण्याचे निर्देश होते. अर्थात, एकाच एजन्सीचा सल्ला घेऊन नियुक्त करा, असे नमूद नसताना केवळ टक्केवारीच्या मोहापायी सत्ताधारी ‘वॅपकॉस’च्या प्रेमात पडल्याचे चित्र आहे. एजन्सीचा तांत्रिक सल्ला तब्बल १५ कोटींच्या घरात जात असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शहरातील विकास कामांना चालना देण्यासाठी शासनाने निधी देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी राज्य शासनाकडे लावून धरली. २०१४ मधील हिवाळी अधिवेशनात शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी कालबाह्य झाल्याचा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यावेळी महान ते अकोला शहर व संपूर्ण शहरातील जलवाहिनीचे जाळे बदलण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी तांत्रिक सल्लागार पदी एजन्सी नियुक्त करण्याचे सुचवले होते. साहजिकच, जलवाहिनीचे जाळे बदलण्यासाठी किमान शंभर ते दोनशे कोटींपेक्षा जास्त खर्च अपेक्षित असताना, सत्ताधाऱ्यांनी विविध कंपन्या, एजन्सींसोबत बोलणी, चर्चा करणे क्रमप्राप्त होते. तसे न करता, सत्तापक्षाने एकमेव हरियानातील वॅपकॉस एजन्सीला पसंती दर्शविली. शहर हिताचा एवढा मोठा निर्णय होत असताना, त्याची एजन्सीच्या मुद्यावर वाच्यता करणेही सत्ताधाऱ्यांनी टाळले. एजन्सीनेदेखील सेवा शुल्क ासह विविध शुल्काची आकारणी करीत सत्ताधाऱ्यांकडे १० ते १५ कोटींचा मोबदला मागितल्याची माहिती आहे. राज्यासह देशात विविध एजन्सी कार्यरत असताना एकाच एजन्सीला काम देण्याचा आग्रह होत असल्याने सत्तापक्षाप्रती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.