यांत्रिकीकरणामुळे पशुधन होतेय हद्दपार
By Admin | Updated: August 6, 2015 23:29 IST2015-08-06T23:29:56+5:302015-08-06T23:29:56+5:30
काही वर्षांच्या काळात शेती कामासाठी ट्रॅक्टर पॉवर टिलरचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यात दळणवळणासाठी

यांत्रिकीकरणामुळे पशुधन होतेय हद्दपार
बोर्ली-मांडला : काही वर्षांच्या काळात शेती कामासाठी ट्रॅक्टर पॉवर टिलरचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यापूर्वी रायगड जिल्ह्यात दळणवळणासाठी बैलगाडीचा उपयोग मोठ्याप्रमाणत होत असे, मात्र आता शेतातील धान्य मालवाहतुकीसाठी टेम्पोसह अन्य वाहने मोठ्याप्रमाणावर धावू लागली. त्यातच रात्री गुरे चोरण्याचे प्रकार वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे बैल, गाय, म्हैस असे पशुधन कमी होत आहे.
लोकसंख्येच्या तुलनेने पशुधनाची झपाट्याने घटणारी संख्या हा रायगड जिल्ह्यात चिंतेचा विषय बनला आहे. रायगड जिल्ह्यातील बहुतेक तालुक्यातील परिसर हा निसर्गरम्य असून शेतीबरोबर पशुधन हा मोठ्या प्रमाणात होते. जिल्ह्यातील औद्योगिकीकरणामुळे शेतीच्या तंत्रज्ञानाच्या बदलासोबत पशुधनाचा उपयोग कमी होत गेला. दूध उत्पादन हा एकच पशुधन सांभाळण्यासाठी टिकणारा उद्योग ठरला. दूध डेअरी प्रकल्प झपाट्याने वाढल्याने स्पर्धेत शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाला मागणी कमी झाली. स्पर्धेमध्ये स्वस्त दूध शोधण्याच्या नादात पावडरयुक्त दूध मिळत असल्याने ग्राहकांची फसवणूक होत आहे असे शेतकरी संदेश पाटील यांनी सांगितले. शेतीमध्ये ट्रॅक्टर, टिलर पॉवरचा सर्रास उपयोग होवू लागला असल्याने शेतीच्या मशागतीची कामे ट्रॅक्टरसारख्या आधुनिक साधनाने मोठ्याप्रमाणात होवू लागली त्यामुळे जनावरे ठेवणे डोकेदुखी होवू लागली आहे. शेतकऱ्यांकडे जनावरांचे प्रमाण कमी झाल्यामुळे शेतीला शेणखत मिळणे दुरापास्त झाले आहे. सेंद्रिय शेतीचा आधारच शेणखत आहे. सध्या उत्तम सेंद्रिय शेतीसाठी जमिनीमध्ये सेंद्रिय द्रव्याचे प्रमाण फारच कमी झाले आहे. (वार्ताहर)