शुक्रवारच्या महासभेत केडीएमसीचे अंदाजपत्रक
By Admin | Updated: May 26, 2014 04:16 IST2014-05-26T04:16:17+5:302014-05-26T04:16:17+5:30
१६व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे सन २०१४-१५चे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अंदाजपत्रक महासभेला सादर झाले नव्हते

शुक्रवारच्या महासभेत केडीएमसीचे अंदाजपत्रक
कल्याण : १६व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या आचारसंहितेमुळे सन २०१४-१५चे कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अंदाजपत्रक महासभेला सादर झाले नव्हते, परंतु आता आचारसंहिता संपल्याने येत्या ३० मे रोजीच्या महासभेत ते अंतिम मंजूरीसाठी स्थायी समितीकडून सादर होणार आहे. दुपारी २ वाजता महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. केडीएमसीचे सन २०१४-१५चे १५१६कोटी १७ लाख रुपये जमा आणि १५१५ कोटी ९१ लाख रुपये खर्चाचे २५ लाख ५१ हजार रूपयांचे शिलकी अंदाजपत्रक १५ फेब्रुवारी २०१४ ला तत्कालीन आयुक्त शंकर भिसे यांनी स्थायी समितीला सादर केले होते. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ५ मार्च रोजी लागू झाल्याने अंदाजपत्रकाला महासभेची मंजुरी घेता आली नाही. दरम्यान निवडणुकीची आचारसंहिता संपल्याने शुक्रवारी ३० मे रोजी महासभा आयोजित करण्यात आली असून यात अंदाजपत्रक सादर केले जाणार आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात जुन्याच मुद्द्यांना उजळणी देण्याचा प्रयत्न झाला तरी कोणतीही कर आणि दरवाढ नाही, ही समाधानाची बाब ठरली आहे. विकासकामांसाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचे कारण पुढे करीत सद्यस्थितीत सुरू असलेल्या विकासकामांनाच पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या अंदाजपत्रकाबरोबरच परिवहन आणि शिक्षण मंडळाचे अंदाजपत्रकही सादर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)