माणगाव-दिघीमध्ये औद्योगिक प्रकल्प, ३ लाख रोजगार निर्मिती होणार; सुनील तटकरे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 10:03 IST2025-01-22T10:03:22+5:302025-01-22T10:03:45+5:30
Sunil Tatkare News: केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागांतर्फे रायगड जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्प माणगाव-दिघी परिसरात उभारला जाणार आहे.

माणगाव-दिघीमध्ये औद्योगिक प्रकल्प, ३ लाख रोजगार निर्मिती होणार; सुनील तटकरे यांची माहिती
अलिबाग - केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या उद्योग विभागांतर्फे रायगड जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणारा दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्प माणगाव-दिघी परिसरात उभारला जाणार आहे. यासाठी ४ हजार एकरवर १ हजार ८६५ कोटी रुपये खर्च करून पायाभूत सुविधा देण्यात येणार आहेत. १ हजार हेक्टरवर बल्क ड्रग पार्क, ६१ हेक्टरवर चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पासाठी जागा नियोजित केली आहे. या कामांना फेब्रुवारीत सुरुवात होणार असल्याची माहिती खा. सुनील तटकरे यांनी मंगळवारी अलिबागमध्ये पत्रकार परिषदेत दिली. दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्पामुळे ३ लाख रोजगार निर्मिती होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. माणगाव, तळा आणि परिसरात दिघी औद्योगिक वसाहतीची उभारणी होणार आहे. फेब्रुवारीमध्ये प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे, असे ते म्हणाले.
चर्मोद्योग प्रकल्पासाठी १०० कोटींचे अनुदान
दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्पात प्रामुख्याने तीन प्रकारच्या उद्योगांचा समावेश असणार आहे. यात वाहन उद्योग प्रकल्प, चर्मोद्योग समूह विकास प्रकल्प आणि बल्क ड्रग पार्क प्रकल्पांचा समावेश आहे.
भुवन, गोठवल, रातवड या गावाच्या हद्दीत चर्मोद्योग समूह विकास प्रकल्प, तर वाहन उद्योग प्रकल्प भाले, जांबगाव, पहूर, बोनशेत या गावाच्या परिसरात उभारला जाणार आहे. चर्मोद्योग समूह विकास प्रकल्पासाठी शासनाचे १०० कोटींचे अनुदान उपलब्ध झाले आहे.
तलावांची निर्मिती करणार
प्रकल्पासाठी लागणारे पाणी हे कुंडलिकाच्या पात्रातून कामत गावातून आणले जाणार आहे. यासाठी १२० दशलक्ष घनमीटर पाणीसाठवण क्षमता असलेल्या तलावाची निर्मिती केली जाणार आहे, असे तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस येथे असून दिघी औद्योगिक वसाहत प्रकल्पासाठी करारात कारखाने प्रस्तावित होऊ शकतात, असेही खासदरा सुनील तटकरे यांनी सांगितले.