खोपोली रेल्वे स्थानकात प्रथमच बसविले इंडिकेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:23 IST2019-07-24T23:22:51+5:302019-07-24T23:23:03+5:30
प्रवासी समाधानी : अनेक दिवसांच्या मागणीची रेल्वे प्रशासनाने घेतली दखल

खोपोली रेल्वे स्थानकात प्रथमच बसविले इंडिकेटर
कर्जत : खोपोली औद्योगिक क्षेत्र असल्याने तेथे अनेक कारखाने आहेत. त्यामुळे खोपोलीला महत्त्व प्राप्त झाले आणि तेथील रेल्वे सेवा अधिक चांगली झाली. प्रवाशांनी मागणी करूनही खोपोली रेल्वे स्थानकावर इंडिकेटरची व्यवस्था होत नव्हती. आता तेथे डिजिटल इंडिकेटर बसविण्यात आले आहेत. या स्थानकावर इतिहासात प्रथमच इंडिकेटर लावल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
रेल्वे स्थानकात प्रवाशांना लोकल गाड्यांची माहिती मिळावी म्हणून इंडिकेटरची आवश्यकता असते. खोपोली रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे झाली. अगदी कोळसा वापरून वाफेचे इंजिन असलेली गाडी सुद्धा सुरवातीची अनेक वर्षे सुरू होती. त्यानंतर लोकल गाड्या सुरू झाल्या, परंतु उद्योग नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खोपोली रेल्वे स्थानकात इंडिकेटरची व्यवस्था नव्हती. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असे. इंडिकेटर बसविण्यासाठी प्रवाशी वर्गाने मागणीही केली होती,परंतु रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही. अखेर काही प्रवाशांनी ही बाब सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यांनी गेल्या एक वर्षापासून या बाबतीत पाठपुरावा केला आणि त्यांना यश आले.
ओसवाल यांनी सर्व प्रथम ११ जून २०१८ रोजी रेल्वे प्रशासनाला खोपोली रेल्वे स्थानकात लोकल गाड्यांसाठी डिजिटल इंडिकेटर नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत असल्याने खोपोली रेल्वे स्थानकात त्वरित डिजिटल इंडिकेटर बसविण्यात यावेत अशी लेखी मागणी रेल्वे प्रशसनाकडे केली होती. रेल्वे प्रशासनाने आपल्या नेहमीच पद्धतीने खोपोली रेल्वे स्थानकात इंडिकेटरची आवश्यकता आहे का? याची पडताळणी करू व जरूर असेल तरच खोपोली येथे इंडिकेटर बसविण्यात येईल असे चाकोरीबद्ध उत्तर प्रशासनाने कळविले होते. खोपोली रेल्वे स्थानक महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे दररोज हजारो प्रवाशी रेल्वे सेवेचा वापर करतात. तेथे डिजिटल इंडिकेटर आवश्यकता आहे हे ओसवाल यांनी पटवून दिले. त्यानंतर ११ आॅक्टोबर २०१८ रोजी रेल्वे प्रशासनाने लवकरच खोपोली रेल्वे स्थानकात इंडिकेटर बसविण्यात येतील असे ओसवाल यांना कळविले.
चार महिने झाले तरी इंडिकेटर बसविले नाहीत म्हणून ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरुच ठेवला. अखेर या स्थानकावर इंडिकेटर बसविण्यात आले आणि प्रवाशांची गैरसोय दूर झाली असून समाधान व्यक्त होत आहे.