माथेरान : दस्तुरी नाक्यावर पर्यटकांची दिशाभूल करून आर्थिक फसवणूक होत असल्यामुळे कष्टकऱ्यांपासून हॉटेल व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. ही फसवणूक बंद न झाल्यास मंगळवार, १८ मार्चपासून माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा पर्यटन बचाव संघर्ष समितीने दिला. अधीक्षक कार्यालयात झालेल्या समिती सदस्यांच्या बैठकीत स्थानिक प्रशासनाने प्रतिसाद न दिल्याने समिती आक्रमक झाली आहे. माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने केलेल्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने जाहीर करण्यात आलेल्या बेमुदत बंदला येथील हॉटेल इंडस्ट्री, ई-रिक्षा संघटना, व्यापारी, विविध सामाजिक संस्था यांनी समर्थन दिले आहे. स्थानिक प्रशासन लेखी स्वरूपात मागण्या कायमस्वरूपी पूर्ण करत नाही. तोपर्यंत बेमुदत बंद करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आहेत प्रमुख मागण्यामाथेरानचे मुख्य प्रवेशद्वार असणाऱ्या दस्तुरी नाक्यावर पर्यटकांना गावात आणण्याऐवजी बळजबरीने पॉइंट्स दाखवून उशिरा हॉटेलमध्ये सोडण्यात येते. मिनी ट्रेन बंद असून, ई-रिक्षाची सेवा फक्त स्थानिकांना दिली जाते, अशी खोटी माहिती देऊन स्वतःच्या घोड्यावर बसवून नवख्या पर्यटकांची दिशाभूल करून अव्वाच्या सव्वा रक्कम उकाळली जाते. त्यासाठी दस्तुरी नाक्यावरील अंतर्गत भागात घोडेवाले असोत किंवा कुली, रूम्सचे एजंट, रिक्षावाले यांना प्रवेश देऊ नये. जागोजागी माहिती फलक लावण्यात यावेत, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत.
विद्यार्थ्यांना फटका -माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने मागण्यांसाठी माथेरान बेमुदत बंद करण्याचा इशारा २७ फेब्रुवारीला अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, मुख्याधिकारी राहुल इंगळे, वनखात्याच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना निवेदनाद्वारे दिला होता, परंतु १० दिवस उलटूनही कार्यवाही न झाल्यामुळे समितीने बंदचा निर्णय घेतला आहे. बंदमध्ये शालेय विद्यार्थ्यांनाही ई-रिक्षाची सेवा बंद करण्यात येणार आहे, असे संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल यांनी सांगितले. या वेळी समितीचे प्रमुख कुलदीप जाधव, मनोज खेडकर, शिवाजी शिंदे, प्रवीण सकपाळ, राजेश चौधरी, प्रदीप घावरे, चंद्रकांत जाधव, हॉटेल इंडस्ट्रीचे उमेश दुबल, ई-रिक्षा संघटनेचे अध्यक्ष शकील पटेल, चर्मकार समाज अध्यक्ष नितेश कदम, महिला आघाडीच्या संगीता जांभळे आदी उपस्थित होते.