म्हसळा तालुक्यात पीक लागवड क्षेत्रात वाढ; चाकरमान्यांचा शेतीकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2020 11:56 PM2020-07-19T23:56:08+5:302020-07-19T23:56:21+5:30

मनुष्यबळ वाढल्याने उत्पन्न वाढीवर भर

Increase in crop acreage in Mhasla taluka; Servants tend towards agriculture | म्हसळा तालुक्यात पीक लागवड क्षेत्रात वाढ; चाकरमान्यांचा शेतीकडे कल

म्हसळा तालुक्यात पीक लागवड क्षेत्रात वाढ; चाकरमान्यांचा शेतीकडे कल

googlenewsNext

म्हसळा : तालुक्यात कोरोनाच्या कालावधीत शहरी व ग्रामीण जनजीवनात बदल झाले असतानाच, तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींतील ८० गाव-वाड्यांतून सुमारे २० ते २१ हजार चाकरमानी दाखल झाले होते, त्यापैकी बहुतांश चाकरमान्यांनी शहरे लॉकडाऊन आसल्याने आपले लक्ष पारंपरिक शेतीकडे केंद्रित केले. त्यामुळे तालुक्यातील पीक लागवड क्षेत्र वाढले असल्याची माहिती कृषी विभागाकडून प्राप्त झाली.

यावेळी ७५ हेक्टर क्षेत्रांत भात, २० हेक्टर क्षेत्रांत नाचणी व सुमारे १५ हेक्टर क्षेत्रांत वरी पीक वाढले आसल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तालुक्यात मागील वर्षी २,४०० हेक्टर क्षेत्रात भाताची, ४०० हेक्टर क्षेत्रात नाचणी तर सुमारे १०० हेक्टर क्षेत्रांवर वरील पिके घेतली होती. यंदा शहरातील चाकरमानी शेतात आल्याने मनुष्यबळही वाढले असल्याने, अधिक क्षेत्रात पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

तालुक्यात भातलावणी पूर्ण झाली असून, आता म्हसळा तालुक्यातील शेतकरी फळ बागायतींच्या मशागतीकडे वळला आहे. चाकरमानी आपल्या बागायतींना खते व अंतर्गत मशागतीची कामे करण्यात व्यस्त झाला आहे. काही शेतकरी रोजगार हमी योजनेंतर्गत काजू, आंबा लागवड करीत आहेत. यावेळी लावणीमध्येही तालुक्यातील चाकरमानी युवकांनी यावेळी चिखलणीसाठी यंत्राचा वापर चांगल्या पद्धतीने केला असल्याचे कृषी विस्तार अधिकारी मंगेश साळी यांनी सांगितले.

चालू हंगामात ग्रामीण भागांतून भात संकरीत व सुधारित जातीच्या बियाण्याची मागणी बºयापैकी होती. मागील वेळेपेक्षा दोन क्विंटल भाताचे बियाणे जास्त विकले गेले असल्याची माहिती खत व बियाणे विक्रेते नीलेश सायगावकर यांनी दिली.

ग्रामीण भागातील तरुणांचा कल बºयापैकी शेतीकामाकडे झुकला आहे. खरीपात तालुक्यात भात, नागली, वरी व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी अन्य भाजीपाल्याचीही बºयापैकी लागवड केली आहे. रब्बीतील लागवडीबाबतही शेतकरी चौकशी करत आहेत.
- सुजय कुसाळकर, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, म्हसळा

आमच्या गावात कोविड १९च्या लॉकडाऊनमध्ये आलेल्या ग्रामस्थांनी चालू खरीप हंगामात शेतीकडे विशेष लक्ष दिले आहे. खरसई, मेंदडी, बनोटी पट्ट्यांतील बहुतांश शेती व वरकस शेती लागवडीखाली आणली गेली आहे.
- नीलेश मांदाडकर, सरपंच, खरसई

Web Title: Increase in crop acreage in Mhasla taluka; Servants tend towards agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.