तटबंदी कशी मजबूत करायची हे मलाच माहीत - सुनील तटकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 23:05 IST2019-09-11T23:05:22+5:302019-09-11T23:05:47+5:30
तुम्हाला हवे ते लिहा; मला पाहिजे तेच मी करणार, असे मिस्कील भाष्यही त्यांनी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीलाच आता जणू सुरुवात झाल्याचे चित्र बुधवारी धाटावमधील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पाहावयास मिळाले

तटबंदी कशी मजबूत करायची हे मलाच माहीत - सुनील तटकरे
धाटाव : माझे नाव तटकरे आहे; तटबंदी मजबूत कशी करायची हे फक्त आणि फक्त मलाच माहीत आहे. तुमच्यासारखे अनेक बंधू माझ्यासोबत आहेत, जनतेवर कटाक्ष टाकत अनेकांची नावे घेत खासदार सुनील तटकरे यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केलेल्या अनेकांवर आक्रमक शैलीत निशाना साधून टिपणी केल्यामुळे या ठिकाणी चांगलाच हास्यकल्लोळ उडाला. तुम्हाला हवे ते लिहा; मला पाहिजे तेच मी करणार, असे मिस्कील भाष्यही त्यांनी केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीलाच आता जणू सुरुवात झाल्याचे चित्र बुधवारी धाटावमधील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी पाहावयास मिळाले. तर धाटावमधील आजच्या दमदार भाषणाने मात्र सर्वांच्या भुवया चांगल्याच उंचावल्या.
धाटाव येथील आदर्शवत यशवंत ग्रामपंचायतीच्या बहु-उद्देशीय सामाजिक सभागृह कामाच्या भूमिपूजन सोहळ्यासमयी ते बोलत होते.
या वेळी विधानपरिषदेचे आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विजयराव मोरे, जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, महिला अध्यक्षा दीपिका चिपळूनकर, आदीसह ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.