शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ द्या, भाजप किसान मोर्चाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:18 IST2021-02-03T00:18:28+5:302021-02-03T00:18:43+5:30
Farmer News : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली.

शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ द्या, भाजप किसान मोर्चाची मागणी
नेरळ : शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा लाभ मिळावा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालय आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. तहसील कार्यालयात नायब तहसीलदार सुधाकर राठोड आणि तालुका कृषी अधिकारी शीतल शेवाळे यांना निवेदन देण्यात आले.
कर्जत तालुक्यात अवकाळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे तत्काळ करून त्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, याबाबत मागे भारतात जनता पक्षाच्या किसान मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांना एक दमडीही मिळाली नाही, याचा जाब विचारण्यासाठी किसान मोर्चाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे शिष्टमंडळ भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला निवेदन देण्यासाठी भेटले. कर्जत तहसीलदार कार्यालयात निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी निवेदन स्वीकारले.
तहसील कार्यालयानंतर भाजप किसान मोर्चाचे कार्यकर्ते तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे गेले. त्यावेळी शेतकऱ्यांनी भरलेली रक्कम पीकविमासंबंधी असून, भविष्यात नुकसानभरपाई मिळाली नाही. प्रधानमंत्री पीकविमा योजना मध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली आहे. मात्र, शेतकऱ्यांना मिळत नसेल तर याला जबाबदार महाराष्ट्र शासन, कृषी अधिकारी आणि विमा कंपनी आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी
केला. यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
शासन शेतकऱ्यांची दिशाभूल करून लाभापासून वंचित ठेवून फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. भाजप किसान मोर्चा न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन देत आहे. यावेळी भाजप किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे, जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे उपस्थित होते.