गाईच्या शेणापासून साकारल्या गणेशमूर्ती; पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 06:20 IST2019-07-20T23:32:37+5:302019-07-21T06:20:18+5:30
पंचगव्य चिकित्सालयाचा अभिनव उपक्रम

गाईच्या शेणापासून साकारल्या गणेशमूर्ती; पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न
पनवेल : खारघरमध्ये गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार करण्याचा अभिनव उपक्रम पंचगव्य चिकित्सालयमार्फत राबविण्यात आला आहे. पंचगव्य व कर्करोगतज्ज्ञ डॉ. नवनाथ दुधाळ यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आलेला आहे. देशी गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या या मूर्ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहेत.
गणेशोत्सव अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपला असून, शासनाच्या मार्फतही पर्यावरणपूरक व शाडूच्या गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन गणेशभक्तांना केले जाते. पीओपीच्या गणेशमूर्ती पर्यावरणाला घातक असतात. अशा परिस्थितीत शेणापासून तयार केलेल्या या मूर्ती पर्यावरणपूरक आहेत. विशेष म्हणजे, या मूर्तींचे विसर्जन राहत्या घरी, कुंडीमध्ये करता येऊ शकते.
विसर्जनानंतर मूर्ती शेणखत म्हणून काम करील, असा दावाही डॉ. नवनाथ दुधाळ यांनी केला आहे. सध्याच्या घडीला ४० रुपयांपासून ३५० रुपयांपर्यंत या गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अशाप्रकारे शेणापासून तयार केलेल्या मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षणही डॉ. दुधाळ देणार आहेत. स्वयंरोजगार व मेक इन इंडियाला साजेसा असा हा उपक्रम आहे. अनेकांना यापासून रोजगारनिर्मिती होईल व स्वदेशीचा प्रचार होईल, अशी धारणा यामागे दुधाळ यांची आहे. डॉ. दुधाळ यांनी अनेक वर्षे टाटा कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये सहायक शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.
इकोफ्रेंडली गणेशमूर्तींना मागणी
पर्यावरण संवर्धनासाठी सरकारकडून वारंवार जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी वृक्षारोपण, संवर्धन, प्लॅस्टिक बंदी सारखे अभियान राबविले जात आहेत. त्यामुळेच प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींपेक्षा शाडूच्या मूर्तींची मागणी भक्तांकडून वाढली आहे. याशिवाय बाप्पाच्या सजावटीतही इकोफ्रेंडली साहित्याचा वापर होऊ लागला आहे. आत डॉ. नवनाथ दुधाळ यांनी गाईच्या शेणापासून गणेशमूर्ती तयार केल्या आहेत.