पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 19:03 IST2025-12-26T18:50:49+5:302025-12-26T19:03:45+5:30
खोपोलीतील माजी नगरसेवक काळोखे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
Khopoli Mangesh Kalokhe Murder Case: शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्येनंतर खोपोलीमध्ये तणावाचे वातावरण असतानाच, पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या खुनाचा कट रचल्याचा गंभीर ठपका ठेवत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि जिल्हा प्रवक्ते भरत भगत यांच्यासह एकूण १० जणांवर खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राजकीय सूडाचा भीषण शेवट?
मंगेश काळोखे हे आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत काळोखे यांच्या पत्नी मानसी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार उर्मिला देवकर यांचा ७०० हून अधिक मतांनी पराभव केला होता. या पराभवाचा राग आणि जुन्या राजकीय वैमनस्यातूनच हा कट रचला गेल्याचा आरोप मृताच्या पुतण्याने केला आहे.
गुन्हा दाखल झालेले प्रमुख आरोपी
मयत मंगेश काळोखे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सुधाकर परशुराम घारे (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी - अजित पवार गट), भरत भगत (जिल्हा प्रवक्ते, राष्ट्रवादी) रवींद्र परशुराम देवकर (पराभूत उमेदवाराचे पती), दर्शन रवींद्र देवकर, धनेश रवींद्र देवकर, सचिन संदीप चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बाउन्सर आणि इतर ३ अनोळखी व्यक्तींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे मंगेश सदाशीव काळोखे हे देवकर यांचे चुलते होते.
शाळेतून परतताना काळाचा घाला
मंगेश काळोखे हे शुक्रवारी सकाळी आपल्या मुलांना शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रस्त्यातच गाठले. त्यांच्यात बाचाबाची झाली आणि पाहता पाहता हल्लेखोरांनी तलवार, कोयता व कुऱ्हाडीने काळोखेंवर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात काळोखे रक्ताच्या थारोळ्यात पडले आणि उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.
खोपोलीत तणाव; बाजारपेठ बंद
या हत्या प्रकरणामुळे खोपोलीमध्ये संतापाची लाट उसळली आहे. घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली असून, जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका काळोखे कुटुंबीयांनी घेतली आहे.
सुधाकर घारे आणि विधानसभा निवडणूक कनेक्शन
सुधाकर घारे यांनी मागील विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघातून आमदार महेंद्र थोरवे यांच्याविरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. या अत्यंत चुरशीच्या लढतीत घारे यांचा अल्प मतांनी पराभव झाला होता. या निवडणुकीत मंगेश काळोखे यांनी थोरवे यांच्यासाठी मोठे मताधिक्य मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळेच हा राजकीय वचपा काढण्यात आल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.