हवामान बदलामुळे मुरुडमधील मच्छीमारांची घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 00:03 IST2019-10-25T00:02:46+5:302019-10-25T00:03:13+5:30
वादळी वारा सुरू झाल्याने होड्या किनाऱ्यावर

हवामान बदलामुळे मुरुडमधील मच्छीमारांची घरवापसी
मुरुड : मागील चार दिवसांपासून मुरुड तालुक्यात पावसाळी वातावरण असल्यामुळे समुद्राला मोठी भरती आलेली आहे, त्यामुळे खोल समुद्रात गेलेल्या बोटी या स्थिर राहत नाहीत. त्याचबरोबर वाºयाचा वेग वाढल्याने मुरुड तालुक्यातील होड्यांची घरवापसी झाली आहे. अचानक हवामानात बदल झाल्याने ऐन दिवाळीत मच्छीमारांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. गणपती उत्सवादरम्यान जी स्थती निर्माण झाली होती तीच परिस्थिती दिवाळीत झाल्याने सणासुदीच्या काळात समस्त कोळी बांधवांवर मोठे संकट कोसळले आहे.
मुरुड तालुक्यात ६५० यांत्रिकी व बिगर यांत्रिकी होड्या असून, वेगाने सुटणार वारा व समुद्रातील पाणी खवळल्यामुळे कोणतीही होडी स्थिर राहत नसल्याने, त्याचप्रमाणे जाळी पाण्यात टाकली असता खवळलेल्या समुद्रामुळे सर्व होड्या आगरदांडा व राजपुरी खाडीत परतल्या आहेत. खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी बर्फ , डिझेल व भोजनासाठी लागणारे सर्व साहित्य घेऊन निघालेल्या बोटी अचानक हवामान बदलामुळे जेमतेम दोन दिवसांत माघारी यावे लागले.
एका बोटीला सर्व साहित्य खरेदीसाठी किमान ७० हजार रुपयांचा खर्च येत असतो; परंतु बोटी या वेळी लवकर आल्याने हा खर्च कोळी बांधवांना न परवडणारा आहे. आगरदांडा व राजपुरी बंदरात पुन्हा बोटीच बोटी दिसत आहेत. एकाच पावसाळ्यात तीन वेळा मच्छीमारांनापुन्हा किनारा गाठावा लागल्याने मच्छीमारांवर उपासमारीची पाळी आली आहे.
या सर्व संकटांना मच्छीमारांना तोंड द्यावे लागत असतानाच डिझेल परतावा रक्कमसुद्धा शासनाकडून प्राप्त झालेली नाही. २०१७ ते २०१९ अशा तीन वर्षांचा परतावासुद्धा देण्यात न आल्याने कोकणातील समस्त कोळी बांधवांची स्थिती चिंताजनक झाली आहे. तीन वर्षांत डिझेल परतावा न मिळाल्यामुळे मच्छीमार संस्थांची स्थितीसुद्धा बिकट झाली आहे. समुद्रात मासळी मिळत नाही, त्याचप्रमाणे एकाच पावसात तीन वेळा तुफान आल्याने बोटी किनाºयाला आल्याने मच्छीमारांची स्थिती नाजूक झाली आहे.
एकाच पावसाळी हंगामात तीन वेळा हवामानाच्या बदलामुळे मच्छीमारांना किनारा गाठावा लागला आहे. त्यामुळे बोटी ज्या वेळी खोल समुद्रात जात असतात, त्या वेळी सर्व साहित्य घेऊन जात असताना अचानक हवामानाच्या या बदलामुळे लाखो रुपयांचे नुकसान कोळी बांधवांचे झाले आहे. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांपासून कोळी बांधवाना परतावा मिळाला नाही. तरी हा डिझेल परतावा लवकरात लवकर मिळण्यासाठी कोळी बांधवांना शासनाकडून परतावा मिळण्यासाठी मदत करावी, जेणेकरून आर्थिक विवंचनेत सापडलेल्या समाजाला मदतीचा हात मिळू शकेल.
- मनोहर मकू , उपाध्यक्ष,सागरकन्या मच्छीमार संस्था