मृत्यूनंतरही ‘त्यांचा’ सुटला नाही मैत्रीचा हात, गोवंडीतील दोघांचा धरणात बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 13:33 IST2025-05-20T13:32:30+5:302025-05-20T13:33:08+5:30
इम्रान आणि खलील पहाटे पाचच्या सुमारास धरणातील पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत कुत्राही होता. या सर्वांचे शूटिंग इतेश करत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने इम्रान आणि खलील पाण्यात बुडाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी नेरळ पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

मृत्यूनंतरही ‘त्यांचा’ सुटला नाही मैत्रीचा हात, गोवंडीतील दोघांचा धरणात बुडून मृत्यू
कर्जत : सूर्योदय पाहण्यासाठी आलेल्या मुंबईतील गोवंडी येथील दोन तरुणांचा पाली भुतीवली धरणात बुडून रविवारी मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले तेव्हा दोघांचेही हात एकमेकांच्या हातात होते, असे ग्रामस्थांनी सांगितले.
गोवंडीतील इम्रान अजीज खान (वय २३), खलील अहमद शेख (२४) आणि इतेश खांदू हे शनिवारी माथेरानला आले होते. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास ते खासगी कारने भिवपुरी रेल्वे स्टेशनजवळील पाली भुतीवली धरणावर पोहोचले. त्यांच्यासोबत एक कुत्राही होता. उगवणाऱ्या सूर्याचे दर्शन घेण्याचा या मित्रांचा मानस होता. इम्रान आणि खलील पहाटे पाचच्या सुमारास धरणातील पाण्यात उतरले. त्यांच्यासोबत कुत्राही होता. या सर्वांचे शूटिंग इतेश करत होता. पाण्याचा अंदाज न आल्याने इम्रान आणि खलील पाण्यात बुडाले. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी नेरळ पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.
पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने बुडालेल्या तरुणांचा शोध घेऊन त्यांचे मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी त्यांच्यासोबत पोहत असलेला कुत्रा मालकाच्या मृतदेहाभोवती फिरत होता.