अलिबाग : शहरातील कोळीवाडा परिसरातील रहिवासी सुजित गजानन भगत (३०) यांचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. या पावसाळ्यातील हा डेंग्यूचा पहिलाच बळी ठरला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेसह नगर पालिका प्रशासनाने सुदृढ आरोग्य व्यवस्था राबवल्याचा केलेला दावा सुजित याच्या मृत्यूने फोल ठरला आहे. सुजितचा मृत्यू हा अलिबागमधील डेंग्यूचा डास चावूनच झाला आहे, असे आपण कसे म्हणू शकतो, अशी प्रतिक्रिया अलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.अलिबाग कोळीवाड्यात राहणारा मेहनती तरुण अशी सुजितची ओळख आहे. त्याचे दोन-अडीच वर्षांपूर्वीच लग्न झाले असून, दीड वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी ताप आल्याने त्याने स्थानिक दवाखान्यामध्ये उपचार घेतले. त्यानंतर तो कामात व्यग्र झाला. मात्र, जास्त त्रास जाणवू लागल्याने त्याला जिल्हा सरकारी रु ग्णालयात दाखल केले, परंतु सुजितची परिस्थिती गंभीर झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने मुंबईला नेण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी दिला. जे.जे. रुग्णालयात त्याला डेंग्यू झाल्याचे निदान झाले. त्यांच्या शरीरातील पेशी झपाट्याने कमी झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा १७ जुलै रोजी मृत्यू झाला.सुजितच्या मृत्यूने जाग आल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरातील सदस्यांची, त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांच्या आरोग्य तपासणी केली. सुजितला डेंग्यूची लागण होऊन मृत्यू झाल्याने शहरात डेंग्यू पसरल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्हा आरोग्य प्रशासनाने कोळीवाडा परिसरात तपासणी सुरू केली आहे, तर घराजवळ साचलेले डबके व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाकडून करण्यात आले आहे.>फॉगिंग मशिनचा प्रशासनाचा दावा फोलअलिबाग नगर पालिकेचे मुख्याधिकारी महेश चौधरी यांनी मात्र अलिबाग शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये डास निर्मूलनासाठी उपाययोजना केल्या जातात, असे ‘लोकमत’ला सांगितले. त्यामध्ये फॉगिंग मशिन दररोज वॉर्डमध्ये फिरवण्यात येते. त्याचप्रमाणे गटारांमध्ये औषध फवारणीही नित्यनियमाने करण्यात येते, असा दावा केला असला तरी, प्रत्यक्षात मात्र नागरिकांनी हा दावा अमान्य केला आहे.सुजित भगत याचा मृत्यू हा अलिबागमधील डास चावल्यानेच झाला असे आपण सांगू शकत नाही, असे संतापजनक उत्तर चौधरी यांनी दिल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे.अलिबाग नगर पालिका प्रशासनामार्फत डास निर्मूलनासाठी करण्यात येणाºया उपाययोजनांमध्ये सातत्य नाही. २०१० पासून अलिबाग नगर पालिकेमध्ये आरोग्य निरीक्षकाचे महत्त्वाचे पद रिक्त असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप जोग यांनी सांगितले.>डेंग्यूमुळे काही रु ग्णांच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात.२० हजारांच्यावर प्लेटलेट्स असतील तर, येथे उपचार करता येतात. त्याच्या खाली असल्यास त्या रुग्णाला अधिक उपचारासाठी मुंबईला पाठवण्याशिवाय पर्याय नसतो. रुग्णाच्या रक्ताच्या विविध तपासण्या करण्याची सोय अलिबागला उपलब्ध नाही.- डॉ. अनिल फुटाणे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
तरुणाचा डेंग्यूमुळे मृत्यू, अलिबागमध्ये डासांचा प्रादुर्भाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 02:48 IST