महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी
By राजेश भोस्तेकर | Updated: May 17, 2025 15:36 IST2025-05-17T15:35:04+5:302025-05-17T15:36:42+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई आदेश; नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन

महत्त्वाची बातमी! रायगड जिल्ह्यात १७ मे ते ३ जून दरम्यान ड्रोन आणि अन्य हवाई उपकरणांवर बंदी
राजेश भोस्तेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग: भारत सरकारच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर यशस्वी कारवाई केल्यानंतर, संभाव्य बदला घेण्याच्या दृष्टीने दहशतवादी संघटनांकडून ड्रोनचा वापर वाढल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यात १७ मे २०२५ ते ३ जून २०२५ या कालावधीत ड्रोन व तत्सम उपकरणांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार, रायगड जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणी तसेच आजूबाजूच्या परिसरात ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाईट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडिंग, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर्स आणि हॉट एअर बलून यांच्या उड्डाणास सक्त मनाई करण्यात आली आहे.
हा आदेश पोलीस अधीक्षक, रायगड यांच्या शिफारशीनुसार आणि कायदा व सुव्यवस्थेच्या हिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून, कोणतीही शंका असल्यास संबंधित पोलिस ठाण्यात संपर्क साधावा.