चालकाची डुलकी महागात; कार थेट धडकली टोलनाक्यावरील दुभाजकाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 10:08 IST2025-10-25T10:06:03+5:302025-10-25T10:08:17+5:30
टोल कर्मचाऱ्यासह पाच जण जखमी; वृद्ध दाम्पत्य गंभीर

चालकाची डुलकी महागात; कार थेट धडकली टोलनाक्यावरील दुभाजकाला
लोकमत न्यूज नेटवर्क, मोहोपाडा/खोपोली : पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना खालापूर टोलनाका येथे चालकाला डुलकी लागल्याने त्याचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला धडकली. त्याच वेळी तेथे असलेल्या टोल कर्मचाऱ्यालाही धडक बसली. कारमधील वयस्कर आजी-आजोबा गंभीर जखमी झाले असून, वाहनचालक, त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे कार जात असताना चालक तुळशीराम बाबाजी शिंदे (४५) यांना डुलकी लागली. त्यामुळे कारवरील नियंत्रण सुटून कार खालापूर टोलनाक्याच्या सुरक्षा कठड्याला आणि कर्मचाऱ्याला धडकली. त्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात टोल कर्मचाऱ्यासह कारमधील ४ प्रवासी जखमी झाले आहेत. वाहन चालवताना काळजी घ्या असे आवाहन वाहतुक विभागाकडून करूनही अशाप्रकारचा निष्काळजीपणा घडत आहे.
दोघे किरकोळ जखमी
हा अपघात शुक्रवारी सकाळी ६:४० च्या सुमारास घडला. यात खालापूर टोलनाक्यावर कार्यरत असलेले कर्मचारी मच्छिंद्र गोपीनाथ पाटील (४२), कारमधील सुमन बाबाजी शिंदे (७०), बाबाजी शामराव शिंदे (७५) हे तिघे जण जखमी झाले असून त्यातील सुमन शिंदे या गंभीर आहेत. अन्य दोनजण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.
तत्काळ मदतकार्य सुरू
यावेळी देवदूत यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, महामार्ग वाहतूक पोलिस यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, लोकमान्य ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आणि हेल्प फाउंडेशनच्या माध्यमातून या अपघातात मदतकार्य झाले. अपघात घडल्याची माहिती टोल कर्मचाऱ्यांनी तातडीने दिल्याने मदतकार्य वेगाने झाले. ही घटना खालापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडल्याने पोलिस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही सुरू आहे.