Drinking space in the office of Onion Market in APMC Market | एपीएमसी मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर; कांदा मार्केटमधील कार्यालयातच मद्यपानाचा अड्डा
एपीएमसी मार्केटची सुरक्षा वाऱ्यावर; कांदा मार्केटमधील कार्यालयातच मद्यपानाचा अड्डा

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा-बटाटा मार्केटची सुरक्षा धोक्यात आली आहे. मंगळवारी रात्री सुपरवायझरसह अनेक कर्मचारी सही करून मार्केटबाहेर गेले असल्याचे निदर्शनास आले आहे. काही कर्मचारी कार्यालयातच मद्यपान करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. परराज्यातील वाहनेही रात्री मार्केटमध्ये उभी केली जात असून, सुरक्षा व्यवस्थेला शिस्त लावण्यात प्रशासनास अपयश आले आहे.

बाजार समितीमधील पाच मार्केटच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक मंडळाचे गार्ड व संस्थेचे स्वत:चे रखवालदार अशी यंत्रणा आहे. २४ तास मार्केटमध्ये बंदोबस्त ठेवला जातो; परंतु मागील काही वर्षांमध्ये मुख्य सुरक्षा अधिकाºयांचे व प्रशासनाचेही दुर्लक्ष होत असल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेमधील त्रुटी वाढू लागल्या आहेत. अनेक सुरक्षारक्षक सही करून मार्केटच्या बाहेर जात आहेत. मार्केटमधील चुकीचे व्यवहार थांबविण्यातही या विभागाला अपयश येऊ लागले आहे. मंगळवारी रात्री कांदा-बटाटा मार्केटमध्ये सुरक्षारक्षक विभागाच्या कार्यालयामध्ये तीन कर्मचारी मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले.

मद्यपान सुरू असल्याचे छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता कर्मचाºयांनी तत्काळ दारूची बॉटल उचलून लपवून ठेवली. आमची ड्युटी संपली असून, घरी घेऊन जाण्यासाठी दारू आणली असल्याचे कारण उपस्थित सुरक्षारक्षकांनी दिले. उर्वरित दोघांनी तेथून बाहेर जाणे पसंत केले. मार्केटमधील सुपरवायझरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते मार्केटमध्ये गस्त घालत असल्याचे सांगण्यात आले; परंतु संपूर्ण मार्केटमध्ये फेरफटका मारल्यानंतर आवक व जावक गेटवरील सुरक्षा कर्मचारी वगळता इतर कुठेही सुरक्षा विभागाचे कर्मचारी आढळून आले नाहीत.

सुरक्षा विभागाची अनागोंदी निदर्शनास आणून दिल्यानंतर सर्वांचीच धावपळ सुरू झाली.आवक गेटवरील कर्मचाºयांनी सर्वांना फोन करून मार्केटमध्ये येण्यास सांगितल्यानंतर अर्धा तासाने मार्केटमध्ये सर्वत्र पूर्ववत गस्त सुरू केली असल्याचे निदर्शनास आले.
कांदा मार्केटमधील कामकाज सायंकाळी ५ ते ६ पर्यंत पूर्णपणे थांबत असते. मार्केट बंद झाल्यानंतर परराज्यातील मोकळी वाहने आतमध्ये उभी करण्यास परवानगी नाही; परंतु मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थान व इतर राज्यातील मोकळी वाहने मार्केटमध्ये उभी असल्याचे निदर्शनास आले.

सुरक्षारक्षकांचे अभय असल्यामुळेच मार्केटला वाहनतळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रात्री मार्केटमध्ये ट्रक चालक स्टोव्ह व गॅसचा वापर करून उघड्यावरच जेवण बनवत असल्याचेही निदर्शनास आले. या प्रकाराकडेही सुरक्षा विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करत आहेत. यापूर्वी गर्दुल्ल्यांनी सुरक्षा विभागाच्या दोन कर्मचाºयांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या होत्या. यानंतरही रात्री मार्केटशी संबंध नसणाºयांना मार्केटमध्ये अभय मिळू लागले आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी प्रशासक सतीश सोनी यांच्याशी संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

सुरक्षा विभागावर नियंत्रण नाही

एपीएमसीमध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी पदावर माजी कर्नलची नियुक्ती केली आहे. याशिवाय एपीएमसीचे दोन सुरक्षा अधिकारी व त्यांच्या हाताखाली एपीएमसीचे रखवालदार व सुरक्षारक्षक मंडळाचे अधिकारी व सुरक्षारक्षक आहेत; परंतु सुरक्षा विभागावर कोणाचेही नियंत्रण नाही. रात्री वरिष्ठ अधिकारी सुरक्षा विभागाचा आढावा घेत नाहीत. यामुळे कोण कामावर आहे व काय काम करतात, यावर नियंत्रण राहत नसल्याचे एपीएमसीच्याच कर्मचाºयांनी निदर्शनास आणून दिले आहे.

चौकशी होणार का?

एपीएमसीच्या कांदा मार्केटमध्ये मंगळवारी रात्री कार्यालयातच काही सुरक्षारक्षक मद्यपान करत असल्याचे निदर्शनास आले. याशिवाय बहुतांश सुरक्षारक्षक मार्केटच्या बाहेर गेले होते. या सर्वांची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. याविषयी प्रशासक सतीश सोनी यांच्याकडेही काही दक्ष नागरिक पत्रव्यवहार करणार आहेत.

वाहनतळाला पाठिंबा कोणाचा?

बाजार समितीच्या मसाला व इतर मार्केटमध्ये रात्री अनधिकृतपणे वाहनतळ सुरू केले जातात. सुरक्षा विभाग व गेटवरील कर्मचारी बाहेरील ट्रकना रात्री मार्केटमध्ये प्रवेश देतात व पहाटे मार्केट सुरू होण्यापूर्वी बाहेर पाठवतात. कांदा मार्केटमध्येही असे प्रकार सुरू झाले असून, त्याला पाठिंबा कोणाचा? असा प्रश्न उपस्थित केला.

Web Title: Drinking space in the office of Onion Market in APMC Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.