‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 07:17 IST2025-01-29T07:16:21+5:302025-01-29T07:17:10+5:30
व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले.

‘आमचे तीन आमदार आहेत, हे विसरू नका’; रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या वादात भाजपची उडी
लोकमत न्यूज नेटवर्क , माणगाव : रायगडच्या पालकमंत्रिपदावरून शिंदेसेना आणि अजित पवार गटात वाद सुरू असताना यामध्ये भाजपने उडी घेतली आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे पत्रकारांशी बोलताना मंगळवारी दोन्ही पक्षांना कानपिचक्या देत भाजपचेही तीन आमदार आहेत, हे विसरू नका, असे विधान केले.
जनतेने महाविकास आघाडीला नाकारून महायुतीवर विश्वास टाकला आहे. महायुतीच्या सर्वच आमदार, मंत्र्यांनी या विश्वासाला शोभेल, असे वागले पाहिजे. पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर वादविवाद होणे हे महायुतीला शोभा देणारे नाही. पालकमंत्रिपद म्हणजे आपल्या जीवन- मरणाचा प्रश्न नाही, असे स्पष्ट करत व्हिडीओ बाहेर काढण्याची भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसणारी नाही व रायगडला शोभणारी नाही, असे दरेकर म्हणाले.
वाद घालू नका
पदासाठी दोघेही असेच भांडत राहिले, तर ‘तुला न मला...’ अशी अवस्था होईल. भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत. मीसुद्धा मंत्रिमंडळात असायला हवे होते; परंतु पक्षनेतृत्वाच्या पुढे गेलो नाही. सहकारी पक्षाने आपापल्या नेतृत्वाकडे भूमिका मांडावी, असा सल्ला त्यांनी दिला. महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांच्या भाजपप्रवेशाबाबत विचारले असता, भाजप चांगल्या विचारांच्या माणसांना पक्षात नेहमीच संधी देत आला आहे. स्नेहल जगताप यांचा प्रवेश कधी आहे, ते नक्की माहीत नाही. मात्र, त्या भाजपमध्ये प्रवेश करत असतील, तर स्वागत आहे, असे ते म्हणाले.