शिवथरघळ येथील दासबोध जन्मोत्सव यात्रा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2021 00:22 IST2021-02-01T00:21:32+5:302021-02-01T00:22:10+5:30
Dasbodh Janmotsav : प्रतिवर्षी शिवथरघळ येथे होणारा श्री दासबोध जन्मोत्सव यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने देण्यात आली आहे.

शिवथरघळ येथील दासबोध जन्मोत्सव यात्रा रद्द
महाड : गेल्या नऊ महिन्यांपासून देशात सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर शासनाने यात्रा संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रतिवर्षी शिवथरघळ येथे होणारा श्री दासबोध जन्मोत्सव यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने देण्यात आली आहे.
प्रतिवर्षी माघ महिन्यांमध्ये होणारी ही जन्मोत्सव यात्रा यावर्षी १२ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत असून, या संदर्भात नुकत्याच श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या कार्यकारी मंडळाच्या झालेल्या सभेमध्ये शासनाच्या निर्णयानुसार या वर्षीचा दासबोध जन्मोत्सव यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे निवेदन संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे.
या संदर्भात श्री सुंदरमठ सेवा समिती शिवथरघळच्या वतीने समितीचे कार्यवाह मु. रा. पाटणकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे . श्री दासबोधाचे जन्मस्थान शिवथरघळ येथे हा दासबोध जन्मोत्सव दरवर्षी संपन्न होत असतो. या यात्रेमध्ये दररोज चार ते पाच हजार श्री समर्थ भक्त येत असतात. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून सुरू असलेल्या कोरोना आपत्ती संदर्भात शासनाने दिलेल्या यात्रा संदर्भातील निर्बंधांचा विचार करून प्रशासनाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून समितीला हा निर्णय घ्यावा लागल्याचे कळविण्यात आले आहे .