माणगावमधील क्रिप्टझो इंजिनीअरिंग कंपनी बोगस?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 11:55 PM2019-11-16T23:55:01+5:302019-11-16T23:55:22+5:30

सिलिंडर स्फोटाने हादरले शहर; परवानगी फेब्रुवारी २०१९ ची; मात्र तीन वर्षांपासून काम सुरू

Cryptozo Engineering Company Bogus in Mangaon? | माणगावमधील क्रिप्टझो इंजिनीअरिंग कंपनी बोगस?

माणगावमधील क्रिप्टझो इंजिनीअरिंग कंपनी बोगस?

Next

- गिरीष गोरेगावकर 

माणगाव : तालुक्यातील विळेभागाड औद्योगिक क्षेत्रातील क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ४ च्या सुमारास स्फोट झाला. या वेळी जखमी झालेल्या १८ जणांपैकी शनिवारी दोघांचामृत्यू झाला. पोलीस चौकशीत ही कंपनीच बोगस असल्याचे समोर येत आहे. कंपनीत आॅक्सिजन सिलिंडर बनविण्यात येत असले तरी काही महिन्यांपूर्वीच हे काम सुरू करण्यात आल्याचे समोर येत आहे.

क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि. ही कंपनी २०१६ पासून सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. स्फोटात जखमी झालेले कामगारही दोन वर्षांपासून या ठिकाणी काम करीत आहेत. असे असले तरी रायगड उपसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाकडून मिळालेल्या महितीनुसार, कंपनीला फेब्रुवारी २०१९ मध्ये परवानगी देण्यात आल्याचा उल्लेख आहे. म्हणजे क्रिप्टझो आणि अशा अनेक बोगस कंपन्या परिसरात सुरू असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा कंपन्यांमध्ये सुरक्षेबाबत पुरेशा उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

विळेभागाड औद्यौगिक क्षेत्रात शेकडो कंपन्यांनी सुरुवातीला प्लॉट घेतले. मात्र, बोटावर मोजता येतील इतक्याच कंपन्या सध्या अधिकृतरीत्या सुरू आहेत. तर अनेक कंपन्यांनी आपले प्लॉट भाड्याने दिले आहेत. अशा प्लॉटवर क्रिप्टझो इंजिनीअरिंग प्रा. लि.सारख्या कंपन्या बेकायदेशीररीत्या सुरू आहेत.

क्रिप्टझो कंपनी तीन वर्षांपासून चालू असल्याचे शेकडो स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, रायगडचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग उपसंचालक मंडळाचे कंपनी निरीक्षक अंकुश खराडे यांनी, कंपनीला फेब्रुवारी २०१९ मध्ये परवानगी देण्यात आल्याचे स्पष्ट केले. म्हणजे गेली तीन वर्षे कंपनी बेकायदेशीरपणे सुरू असल्याचा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

घटनेस कंपनी प्रशासन कारणीभूत
कंपनीस आग प्रतिबंधक चाचणी करण्याची कोणतीही परवानगी नव्हती, तसेच येथील कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने अ‍ॅप्रोन किंवा लाइफ जॅकेट दिले नव्हते. चाचणी दरम्यान बंद रूममधून हवेचा दाब येणार माहिती होते, म्हणूनच खराब लाकडाचा दरवाजा या कामगारांना धरायला सांगितले होते. हा दरवाजा छोट्या-छोट्या फळ्यांचा व गॅप असलेला होता. ज्या वेळी बंद रूममध्ये त्या गॅसचा दाब वाढला, त्याच वेळी स्फोट झाला आणि दरवाजा धरलेले व दरवाजासमोरील कामगार होरपळले.

घटना कशी घडली
क्रिप्टझो कंपनीत आग विझविण्याच्या अग्निशमन प्रणालीचे ओरगाइज्ड गॅस सिलिंडर रिफिलिंगचे काम चालते. शुक्रवारी सायंकाळी तयार करण्यात आलेल्या नवीन गॅसची बंद रूममध्ये चाचणी घेण्यात आली, त्यासाठी एका रूममध्ये आग लावली व ती विझविण्याची चाचणी सुरू होती. ज्या रूममध्ये ही आग लावली त्या रूमच्या तापमानापेक्षा चाचणी करीत असलेल्या गॅसचे तापमान वाढले आणि रूम लहान असल्याने गॅस जास्त झाला आणि रूमच्या दरवाजावाटे बाहेर आला आणि अवघ्या १० ते १५ सेकंदात दरवाजाजवळ असणारे सर्व कामगार स्फोटात होरपळले.

क्रिप्टझो कंपनीचे चार डायरेक्टर आहेत, त्यातील रवि शर्मा व त्याचे वडील हे देशाबाहेर आहेत, तर उर्वरित धरणे व कोटियन या संचालकांशी बोलणे झाले असून, ते शनिवारी रात्री किंवा रविवारी भेटण्यास येणार आहेत. यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
- रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक, माणगाव

विळेभागाड औद्यौगिक क्षेत्रात आजही हजारो एकर परिसरात शेकडो शेड उभ्या आहेत, त्यातील बऱ्याच शेड बंद अवस्थेत आहेत. यावर कुणाचेही बंधन नाही. काही महिन्यांपूर्वी या विभागात रक्तचंदनाचा अवैधरीत्या ठेवलेला साठा जप्त करण्यात आला होता.

औद्योगिक क्षेत्रात अनेक कंपन्या अनधिकृतपणे सुरू असून, शासनाकडून कोणत्याच प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही. याची संबंधित विभागाकडून साधी चौकशीही होत नाही. औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक रुग्णालय व अम्बुलन्स, अग्निशमन दल व पोलीस चौकी या मूलभूत गरजांची आवश्यकता असल्याचे या वेळी ग्रामस्थांनी सांगितले.

महाड-माणगाव-पोलादपूर विधानसभेचे आमदार भरत गोगावले यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

Web Title: Cryptozo Engineering Company Bogus in Mangaon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.