पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:14 IST2017-10-09T02:13:57+5:302017-10-09T02:14:05+5:30
भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा

पावसामुळे पिकाचे नुकसान , शेतकरी चिंताग्रस्त : आदिवासीवाड्यांतील प्रकार; काळ्या पावसाने भात गळती झाल्याचा दावा
नागोठणे : भात शेतीची कापणी केल्यानंतर भाताचे दाणे शेतात गळून जाण्याचा प्रकार विभागातील आदिवासीवाड्यांवर घडला आहे. १५ दिवसांपूर्वी आमच्या भागात पडलेल्या काळ्या पावसामुळेच हा प्रकार झाला असल्याचा दावा शेतकºयांनी केला आहे. अर्धे अधिक पीक वाया गेल्याने कृषी खात्याने त्याची पाहणी करावी, अशी मागणी वासगाव येथील अशोक कोकरे, जानू कोकरे, कोंडू कोकरेंसह नुकसानग्रस्त शेतकºयांनी केली आहे.
१५ दिवसांपूर्वी शहराच्या पूर्वेकडील वासगाव, ढोकवाडी, पिंपळवाडी, लाव्याचीवाडी आदी आदिवासीवाड्यांवर रसायनमिश्रीत काळ्या रंगाचा पाऊस पडण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महसूल, कृषी तसेच प्रदूषण मंडळाने येथे पाहणी करण्याचा कार्यक्रम उरकला होता. या पावसामुळे बहुतांशी भाजीपाला आणि फळभाजीचे पीक वाया गेले होते. विशेष म्हणजे, संबंधित खात्यांच्या या दौºयात भातशेतीची पाहणी केली होती. भाताचे पीक तेव्हा पूर्ण तयार झाले नसल्याने त्या वेळी भाताचे पीक शाबूत असल्याचा पंचनामा संबंधितांकडून करण्यात येऊन प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रकार केला होता. कालांतराने काही दिवसांनी पिकाची शेतात कापणी करण्यात येऊन ते शेतातच आडवे टाकण्यात आले होते. मात्र, झोडणीसाठी भाताच्या लोंब्या घेतल्या असता, शेतकºयांना त्यावरील भाताचे बहुतांशी दाणे शेतातच गळून गेले असल्याचे शेतकºयांच्या निदर्शनास आले. तयार झालेल्या भात पिकाच्या बुंध्याला, तसेच कणसाला किडींचा प्रादूर्भाव झाल्यामुळेच हाती आलेले पीक गळून गेले असल्याने अर्ध्यापेक्षा अधिक पिकाला आम्ही मुकलो असल्याचे ढोकवाडीतील कमलाकर दरवडे, हेमंत हंबीर यांनी सांगितले.
मागे पडलेल्या काळ्या पावसामुळे भाजीपाला पीक नष्ट झाले होते व आता तयार झालेले भात पीक आमच्या हाताला लागले नसल्याने काळ्या पावसाचाच हा प्रताप असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. तेव्हापासून एकही सरकारी कर्मचारी पंचनामा करण्यासाठी येथे पोहोचलाच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.