Coronavirus: कोरोनाच्या भीतीनं मृत वडिलांना खांदा देण्यास मुलाचा नकार; पोलीस, पत्रकारांनी पार पाडले अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 20:12 IST2021-05-01T20:12:40+5:302021-05-01T20:12:57+5:30
तालुक्यातील केलटे बौधवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव वय ७६ वर्षे हे शुक्रवार दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री अचानक मयत झाले.

Coronavirus: कोरोनाच्या भीतीनं मृत वडिलांना खांदा देण्यास मुलाचा नकार; पोलीस, पत्रकारांनी पार पाडले अंत्यसंस्कार
उदय कळस
म्हसळा - तालुक्यात मनाला हेलावून टाकणारी घटना घडली आहे. वडील कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या संशयावरून मुलगा, नातेवाईक व गावातील नागरिकांनी अंत्यविधीला मदत करण्यास नकार दिल्याने प्रशासन त्या मृत व्यक्तीच्या अंत्यविधीला धावून आले आहे.
तालुक्यातील केलटे बौधवाडी येथील गोविंद कृष्णा जाधव वय ७६ वर्षे हे शुक्रवार दिनांक ३० एप्रिल रोजी रात्री अचानक मयत झाले. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र उपचारानंतर तो घरी परतला. गोविंद यांच्या मृत्यनंतर त्याचा मुलांनी व गावातील नागरिकांनी अंत्यविधी करण्यास नकार दिला. यानंतर काही ग्रामस्थांनी म्हसळा सर्कल दत्ता कर्चे यांच्याजवळ संपर्क साधला.कर्चे यांनी तत्काळ प्रांत अमित शेडगे यांना संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर तहसीलदार शरद गोसावी, सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने कर्चे यांनी तातडीने दैनिक सागरचे पत्रकार निकेश कोकचा व पोलीस हवालदार संतोष जाधव,पोलीस नाईक सुर्यकांत जाधव,१०८ चा पायलेट शरद नांदगावकर व भरत चव्हाण यांना बोलावून घेतले.
केलटे बौधवादी येथे गेल्यानंतर तिर्डी बनवण्यापासून ते २ किलोमीटर लांब स्मशानभूमी पर्यंत मयत खांद्यावर नेह्ण्याचे काम म्हसळा सर्कल दत्ता कर्चे ,पोलीस हवालदार संतोष चव्हाण,पोलीस नाईक सुर्यकांत जाधव,पत्रकार निकेश कोकचा,पोलीस शिपाई कदम,१०८ चा पायलेट शरद नांदगावकर व भरत चव्हाण यांनी केले आहे. मृताला खांदा देऊन पोलीस प्रशासन,तहसील प्रसाशन व पत्रकारांनी माणुसकीचे दर्शनच संपूर्ण गावाला घडवून दिले आहे.मात्र असे प्रकार वारंवार घडू नये म्हणून प्रशासनाने समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचून जनजागृती करण्याची गरज आहे.