Coronavirus : Due to the corona, the beaches, highway empty, blocked the number of tourists | Coronavirus : कोरोनामुळे किनारे, महामार्ग सुनेसुने, पर्यटकांची संख्या रोडावली

Coronavirus : कोरोनामुळे किनारे, महामार्ग सुनेसुने, पर्यटकांची संख्या रोडावली

रेवदंडा : कोकणचे निसर्गसौंदर्य हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा ही दोन्ही गावे पर्यटनासाठी प्रसिद्धीत नसली तरी शिमगोत्सवात या ठिकाणी पर्यटकांची गर्दी असते. मात्र सध्या जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोनाच्या भीतीने पर्यटकांनी पाठ फिरवल्याने रेवदंडा-चौलचा किनारा सुनासुना दिसत आहे.

एरवी सलग सुट्या आल्यावर गजबजून जाणारे किनारे शांत, निर्मनुष्य दिसत आहेत. चौल व रेवदंडा या दोन्ही गावांना स्वतंत्र ओळख आहे. सांस्कृतिक परंपराही आहे. चौलमध्ये नारळ-सुपारीच्या बागा, टेकड्यांवरील पुरातन मंदिरे, आग्राव जेटीवरील ताज्या माशांची खरेदीची मजा तर रेवदंडा म्हटले की पुरातन आगरकोट किल्ला, स्वच्छ व सुरक्षित सुमारे चार किलोमीटरचा किनारा, कोकणातील पदार्थांची खरेदी करण्यासाठी पारनाका हे महत्त्वाचे ठिकाण तर अफनासी निकीतन याचे स्मारक यामुळे एक दिवसीय सहलीसाठी ही ठिकाणे नागरिकांना नेहमीच भुरळ घालतात. मात्र यंदा येथील पर्यटनाला कोरोनाचा फटका बसला आहे.

चौलमध्ये परदेशी पर्यटकांचे आवडते असलेले जान्हवी तळे भागातील हॉटेल मालक निनाद रावते यांनी सांगितले की, पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्याने कॉटेजमधील कर्मचारी रोजगाराशिवाय बसून आहेत. आॅनलाइन होणारे बुकिंगही गेल्या दहा दिवसांत झालेले नाही.
शिमगा उत्सवापासून खरं तर उन्हाळी पर्यटन व्यवसाय सुरू होतो. पण कोरोनाच्या दहशतीने या व्यवसायावर अवकळा पसरली आहे. बहुतांश हॉटेल, रिसॉर्टमधील बुकिंग १५ एप्रिलपर्यंतचे रद्द झाल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई-पुणे महामार्ग पडला ओस

पनवेल : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पुण्यात मोठ्या प्रमाणात झाल्याने याचाच परिणाम मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर दिसून आला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी पुण्याकडे प्रवास करणे टाळल्याने नेहमीपेक्षा या मार्गावर शनिवारी कमी वर्दळ दिसली. विशेषत: खासगी प्रवासी वाहनेदेखील तोट्यात असून अनेक बसेस प्रवाशांअभावी रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास आले.
 

आठवडा बाजाराला कोरोनाचा फटका
1मोहोपाडा : रसायनी पाताळगंगा परिसराची मुख्य बाजारपेठ असणाऱ्या मोहोपाडा येथे दर रविवारी भरणाºया आठवडा बाजाराला कोरोनाचा फटका बसला. बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
2कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीने रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. मोहोपाड्यात रविवारच्या बाजारात मुंबई, ठाणे, पुणे येथून व्यापारी येतात. या वेळी रसायनी पाताळगंगा व आसपासच्या ग्रामीण भागातील नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात.
3कोरोना संसर्गजन्य रोग असल्यामुळे मोहोपाडा वासांबे ग्रामपंचायतीने खबरदारी म्हणून रविवारचा आठवडा बाजार बंद ठेवला आहे. शासकीय पातळीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे आदेश असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोहोपाडा शहरातील बाजार बंद ठेवण्याचे आवाहन वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Coronavirus : Due to the corona, the beaches, highway empty, blocked the number of tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.