चंद्रकांत पाटलांना भेटल्याची ती क्लिप जुनीच, मी राष्ट्रवादीतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 00:51 IST2019-08-03T00:51:25+5:302019-08-03T00:51:31+5:30
सुरेश लाड : दहिवली राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांची बैठक

चंद्रकांत पाटलांना भेटल्याची ती क्लिप जुनीच, मी राष्ट्रवादीतच
कर्जत : सध्या भाजप- सेनेमध्ये मेगा भरती सुरु आहे. मोठे मोठे नेते राष्ट्रवादीसोडून भाजपात गेले. त्यामुळे मी सुद्धा भाजपात जाणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मी आणि सुनील तटकरे २०१७ मध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे कामाच्या संदर्भात गेलो असतांना बाहेर पडतांना आमचे फोटो काढून आता ते सोशल मीडियावर भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतली अशी बातमी करून मुद्दामच व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र यात कोणतेही तथ्य नसून मला पवार साहेबांनी चार वेळा विधानसभेची उमेदवारी दिली. पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळवून देण्यात सहकार्य केले अशा राष्ट्रवादी पक्षाला मी सोडचिठ्ठी देणार नाही. मी राष्ट्रवादीत आहे आणि यापुढेही राहणार. अशी जाहीर ग्वाही आमदार सुरेश लाड यांनी दिली.
कर्जत दहिवली राष्ट्रवादी भवन येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी भगवान भोईर, अशोक भोपतराव आदी उपस्थित होते.