चित्रकथीमुळे तरुणांना खुणावतायेत रोजगाराच्या संधी! पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी मांडले कलेचे महत्त्व
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:10 IST2026-02-11T17:09:24+5:302026-02-11T17:10:38+5:30
"चित्रकला ही जंगलातून जन्माला आलेली कला आहे. पुरातन काळापासून चित्रकथेचे महत्त्व आपण जाणतोच, पण हीच कला आज अनेक तरुणांसाठी ...

चित्रकथीमुळे तरुणांना खुणावतायेत रोजगाराच्या संधी! पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी मांडले कलेचे महत्त्व
"चित्रकला ही जंगलातून जन्माला आलेली कला आहे. पुरातन काळापासून चित्रकथेचे महत्त्व आपण जाणतोच, पण हीच कला आज अनेक तरुणांसाठी रोजगाराचे एक मोठे साधन बनली आहे," असे गौरवद्गार पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी काढले. उलवे नोडमधील माईर्स एमआयटी शिक्षण समूह (पुणे) संचालित 'विश्वशांती गुरुकुल स्कूल' येथील विश्वधर्मी विश्वनाथ सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
एका पेंटिंगला मिळतोय ५ हजारांचा दर
यावेळी बोलताना पद्मश्री गंगावणे यांनी चित्रकथी आणि कळसूत्री बाहुल्यांच्या कलेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "चित्रकथी म्हणजे केवळ एक चित्र नाही, तर ती एक जिवंत कथा आहे. ही कथा तासनतास रंगवली जाते. मी आतापर्यंत ११ लोककलांचे संगोपन केले असून, त्यातील तीन कलाप्रकारांची दखल खुद्द भारत सरकारने घेतली आहे." या कलेच्या माध्यमातून आज अनेक तरुण स्वावलंबी होत असून, एका पेंटिंगला बाजारात ५ हजार रुपयांपर्यंत किंमत मिळत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
गुरुकुल शिक्षण ही काळाची गरज
राम-लक्ष्मणांनी गुरुकुल परंपरेतूनच आपले जीवन घडवले होते, याचा दाखला देत गंगावणे यांनी एमआयटी विश्वशांती गुरुकुलच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवण्यासाठी अशा संस्थांमध्ये शिक्षण घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
मान्यवरांची उपस्थिती
या सोहळ्याला संस्थेच्या विश्वस्त स्वाती कराड-चाटे, शेकाप नेते राजेंद्र पाटील, उषा कराड, प्रभा कसलीवाल, अण्णासाहेब टेकाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका अंशू सक्सेना, ॲकडेमिक हेड शीतल वर्मा, मार्केटिंग व ऑपरेशन्स हेड प्रा. के. सी. मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. पद्मश्री गंगावणे यांच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली होती.