जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 00:03 IST2019-07-15T00:02:52+5:302019-07-15T00:03:02+5:30
अलिबाग-सुडकोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत.

जिल्ह्यातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण
- आविष्कार देसाई
अलिबाग : तालुक्यातील अलिबाग-सुडकोली रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले आहेत. काही ठिकाणचे रस्ते पहिल्याच पावसात वाहून गेले आहेत, त्यामुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली असल्याने तब्बल २४ गावांतील सुमारे ३० हजार नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत असल्याने मेटाकुटीला आले आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीलाच रस्ते बनवण्याचे काम हाती घेतल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाऊस पडल्यानंतर काम बंद करावे लागले होते. सार्वजनिक विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे रस्त्याची विल्हेवाट लागल्याची नागरिकांची तक्रार आहे. तालुक्यातील ग्रामीण भागांना जोडणाऱ्या बहुतांश रस्त्यांची अशाच प्रकारे दुर्दशा झाल्याने बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
निधी उपलब्ध नसल्याची ओरड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सातत्याने करण्यात येते, त्यामुळे जिल्ह्यातील रस्ते सुस्थितीत करण्यात बांधकाम विभागाला अनेक अडचणी येतात. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे पुरेसे मनुष्यबळ नसणे, यंत्रसामग्री नसणे, अशी विविध कारणे त्यांच्याकडून देण्यात येतात, त्यामुळे नागरिकांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागतो. बांधकाम विभागाला निधी प्राप्त झालाच तर तो निधी खर्च करताना पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे या कालावधीत केलेले रस्ते टिकतील का याचा विचार केला जात नसल्याचे अलिबाग-सुडकोली या रस्त्याच्या कामाने दाखवून दिले आहे.
अलिबाग-सुडकोली हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. येथूनच पुढे हा रस्ता रोहा तालुक्याला जोडण्याचे काम करतो. त्यामुळे या रस्त्याची स्थिती भक्कम आणि प्रवास करण्यायोग्य असलीच पाहिजे. मात्र, गेली काही वर्षे रस्त्यांची नुसतीच डागडुजी केली जात असल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्यांवर सातत्याने खड्डे पडत आहेत. खड्डे बुजवतानाही चिखल-मातीचा उपयोग केला
जात असल्याने पावसाच्या एका सरीमध्येच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य पसरते.
अलिबाग-सुडकाली रस्त्याचे काम जून महिन्यात सुरू करण्यात आले. अलिबाग ते बामणगावपर्यंत रस्ता करण्यात आला. नंतर मात्र पावसाने हजेरी लावल्याने बांधकाम विभागाला काम थांबवावे लागले होते. रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने एकतर उशिरा सुरू केले होते. त्यामुळे जून महिन्यात कामाला सुरुवात केल्याने काम पूर्णच होणार नव्हते आणि झालेच असते तर पहिल्याच पावसात केलेले रस्ते आहे तशा अवस्थेतच राहिले असते, असे ग्रामस्थ सचिन भोईर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
पावसाला सुरुवात झाली की यांना रस्त्यांची कामे आठवतात. आताच्या पावसाच्या काही दिवसआधी रस्त्यांची कामे केली जातात, त्यामुळे पावसात रस्ते वाहून जातात. त्यानंतर पुन्हा कामे काढायची आणि कामासाठी येणारा निधी खर्च करून जनतेलाच भुर्दंड बसवायचा, असेच चित्र सध्या पाहायला मिळत असल्याचे ग्रामस्थ सिद्धेश भगत यांनी सांगितले.
१५ मे नंतर डांबरीकरणाच्या रस्त्यांची कामे नियमानुसार करता येत नाहीत. येथे तर जून महिन्यातच कामाला कशी सुरुवात केली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
>अलिबाग-सुडकोली टप्प्यातील गावे
अलिबाग-बामणगावपर्यंत रस्त्याचे काम झाले आहे. कुंठ्यांची गोठी, वढाव, वेलवली-खानाव, खानाव, उसर, घोटवडे, मल्याण, वावे, चिंचोटी, दिवी-पारंगी, फणसापूर, बाफळे, भोनंग, बोरघर, भिलजी, रामराज, उमटे, महानवाडी फाटा, नवघर, नांगरवाडी, तलवली, भागवाडी, नवखार आणि सुडकोली या गावांचा समावेश होतो.
>अलिबाग-सुडकोली रस्त्यावर खड्डे पडले असून यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची शक्यता आहे.
>ग्रामीण भागातून अलिबागला कामासाठी रोजच यावे लागते. वर्षानुवर्षे रस्त्यांची हालत काही सुधारलेली दिसत नाही. खड्ड्यांतून प्रवास करताना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो, असे उमटे येथील रहिवासी आरती पुनकर यांनी सांगितले. दरम्यान, सार्वजनिक विभागाचे उपअभियंता मधुकर चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.