भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 18:35 IST2025-12-27T18:25:40+5:302025-12-27T18:35:17+5:30
मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून पाच जणांनी मिळून त्यांची हत्या केल्याचे दिसत आहे.

भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
Khopoli Mangesh Kalokhe Murder CCTV: खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीतील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्या घटनेचा काळजाचा ठोका चुकवणारा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आला आहे. मुलाला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या मंगेश काळोखे यांच्यावर झडप घालून आरोपींनी त्यांची निर्घृणपणे केल्याचे या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हत्येचा संपूर्ण घटनाक्रम कैद झाला आहे. मंगेश काळोखे आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावरून धावत असताना दिसत आहेत, मात्र हल्लेखोरांनी त्यांना घेरले. मंगेश जमिनीवर कोसळताच तीन जणांनी त्यांच्यावर तलवार आणि कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर एकापाठोपाठ तब्बल २४ ते २७ वार करण्यात आले. हा हल्ला इतका भीषण होता की मंगेश यांचा जागीच मृत्यू झाला. ते मृत झाल्याची खात्री पटल्यानंतरच हल्लेखोर काळ्या रंगाच्या गाडीतून पसार झाले.
मानसी काळोखे या निवडणुकीच्या रिंगणात असताना मंगेश हे सावलीप्रमाणे त्यांच्या मागे उभे होते. नुकत्याच लागलेल्या निकालात मानसी या प्रभाग क्र. ३ मधून निवडून आल्या, तर शिंदे गटाचे कुलदीप शेंडे नगराध्यक्ष झाले. निवडणुकीतील विजयामुळे काळोखे कुटुंबात उत्साहाचे वातावरण होते. मात्र, २६ डिसेंबरच्या सकाळी मुलाला शाळेत सोडून परतताना काळोखे यांच्यावर काळाने घाला घातला.
राजकीय वैमनस्यातून हत्याकांड?
या हत्येमागे निवडणुकीतील वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. मानसी काळोखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) उर्मिला देवकर यांचा मोठा पराभव झाला होता. याच पराभवाचा बदला घेण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, प्रवक्ते भरत भगत यांच्यासह पराभूत उमेदवाराचे पती रवींद्र देवकर आणि अन्य साथीदारांवर गुन्हे दाखल केले आहेत.
खोपोलीत दहशतीचे वातावरण
भररस्त्यात झालेल्या या खुनी खेळामुळे खोपोली शहरात प्रचंड संताप आणि दहशतीचे वातावरण आहे. आरोपींनी सीसीटीव्हीमध्ये चेहरा झाकण्याचा प्रयत्न केला असला तरी पोलिसांनी फुटेजच्या आधारे तपास केला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके विविध ठिकाणी रवाना झाली असून या प्रकरणाने राजकारण चांगलेच तापले आहे.