अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 17:05 IST2025-11-04T17:02:14+5:302025-11-04T17:05:27+5:30
Maharashtra local Body Election: एकीकडे एकनाथ शिंदेंकडून महायुती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले जात असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. त्याची घोषणाही झाली आहे.

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
Maharashtra local Body Election Latest news: रायगड जिल्ह्यात शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कलह महायुती झाल्यापासूनच आहेत. त्यामुळे आता होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्र लढणार का? याची उत्सुकता होती. शिंदेंच्या शिवसेनेकडून राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला गेला होता, पण तो प्रस्ताव पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकरेंनी फेटाळून लावला आणि त्यानंतर कर्जत खालापूर मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडीही करण्यात आली.
शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस रायगड जिल्ह्यातील कर्जत-खालापूर मतदारसंघात असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक एकत्र लढणार नाही, हे स्पष्ट झाले आहे. संपूर्ण रायगड जिल्ह्यातच हा पॅटर्न स्वीकारला जाणार असे स्पष्ट संकेत सुनील तटकरे यांनी दिले आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेने राष्ट्र्रवादी काँग्रेस कोणता प्रस्ताव दिला होता?
शिंदेंच्या शिवसेनेने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसला एक प्रस्ताव दिला होता. प्रस्ताव असा होता की, ज्या पक्षाचा जिथे आमदार आहे, त्याने तेथील जागा लढवाव्यात आणि उरलेल्य जागा तिन्ही पक्षांनी वाटून घ्यायच्या. शिंदेंच्या शिवसेनेचा हा फॉर्म्युला सुनील तटकरेंनी फेटाळून लावला.
तटकरे शिवसेनेच्या प्रस्तावावर काय बोलले?
"आमच्या पक्षाची ताकद जिल्ह्यात मोठी आहे. त्यामुळे जागा कशा मिळवायच्या हे आम्हाला माहिती आहे", असे तटकरे म्हणाले. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी केल्याची घोषणा केली.
कर्जतमधील रेडिसन ब्लू रिसॉर्टमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगडचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, कार्याध्यक्ष अशोक भोपतराव, ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत, तालुकाप्रमुख बाजीराव जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी या बैठकीत होते. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातील तीन नगरपालिका, सहा जिल्हा परिषद आणि १२ पंचायत समितीच्या जागा आघाडी करून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून दोन्ही पक्ष निवडणुकीत उतरणार आहेत.
शिंदेंच्या शिवसेनेने व्यक्त केली नाराजी
ही आघाडी झाल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांचे मनोमिलन झाल्याचे आम्ही बघितले. सत्तेसाठी ते असे प्रयोग करत असतात. पण, आम्ही महायुतीसाठी प्रयत्न करत असताना राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेणे योग्य नाही, तटकरेंनी असे प्रयोग थांबवले पाहिजे."