Accident: डंपर नेले फरफटत, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, दुचाकीला भीषण धडक, तक्रार दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:17 IST2023-04-17T13:17:01+5:302023-04-17T13:17:24+5:30
Accident: कर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील तरुणाचा डंपरच्या धडकेत जीव गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एका दाम्पत्याला जिवाला मुकावे लागले.

Accident: डंपर नेले फरफटत, दाम्पत्याचा जागीच मृत्यू, दुचाकीला भीषण धडक, तक्रार दाखल
नेरळ : कर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील तरुणाचा डंपरच्या धडकेत जीव गेल्याची घटना ताजी असतानाच रविवारी पुन्हा एका दाम्पत्याला जिवाला मुकावे लागले. कर्जत तालुक्यातील चिंचवली येथे डंपरने धडक देऊन दाम्पत्याच्या अंगावरून डंपर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
जिते गावात राहणारे योगेश रामदास जाधव व योगिता योगेश जाधव हे दाम्पत्य चुलत बहिणीच्या लाखरण येथील घरी दुचाकीवरून जात होते. भिवपुरी मार्गे सकाळी जात असताना भिवपुरी रेल्वेस्थानक परिसरातील चिंचवली रेल्वे गेट येथे योगेश यांच्या दुचाकीला खदानीच्या डंपरने धडक दिली. दुचाकीवरून पडलेल्या योगिताच्या अंगावरून चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.. तर योगेश डंपरच्या चाकात अडकला. मात्र डंपर चालकाने त्याला फरफटत नेले. त्यामुळे योगेश गंभीर जखमी झाला. त्याला भिवपुरीच्या रायगड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.
योगेशच्या कमरेकडील भागावरून टेम्पोचे चाक गेल्यानेच त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले. यावेळी चालक डंपर रस्त्यातच उभा करून फरार झाला. कर्जत शहराजवळ खदान असलेल्या चिरमाडे याचा तो डंपर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. नेरळ पोलिसांनी घटनेचा पंचानामा करून दोन्ही मृतदेह नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले . तर चालकाला देखील ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.
चालकांबाबत संताप
कर्जत शहरातील श्रीराम पुलावर दुचाकीवरील एका तरुणाचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाला तर रविवारी या दाम्पत्याचा मृत्यू झाला. डंपर चालकांची या मनमानीबाबात तीव्र संताप व्यक्त होत असून घटनेननंतर उपस्थित जमावानेही रोष व्यक्त केला.