93rd anniversary of Chavdar Sarovar satyagraha Today | चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९३ वा वर्धापन दिन, भीमसैनिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चवदार तळे सत्याग्रहाचा आज ९३ वा वर्धापन दिन, भीमसैनिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

दासगाव - महाडमधील चवदार तळे सत्याग्रहाचा ९३ वा वर्धापन दिन शुक्रवारी महाडमध्ये साजरा होत आहे. प्रतिवर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक दाखल होत असतात. मात्र, या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व अभिवादन सभा रद्द केल्याने फारच तुरळक गर्दी होण्याची शक्यता आहे. येणाऱ्या भीमसैनिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

२० मार्च १९२७ रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह करत सामाजिक क्रांती केली. या सामाजिक क्रांतीची जागतिक पातळीवर नोंद घेतली गेली. या सामाजिक क्रांतीमुळे देशभरातील सामान्य आणि तळागाळातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा हक्क प्राप्त करून दिला.

यामुळे या दिवशी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक दाखल होत असतात. मात्र या वर्षी जागतिक पातळीवर भेडसावणाºया कोरोना प्रादुर्भावामुळे २० मार्च रोजी होणाºया या वर्धापन दिन सोहळ्याला भीमसैनिक फारच कमी प्रमाणात दाखल होणार आहेत. या वेळी होणाºया सर्व राजकीय, धार्मिक आणि सामाजिक संघटनांच्या अभिवादन सभा रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे १९ मार्च रोजी महाड क्रांतिभूमीत होणारी भीमसैनिकांची गर्दी या वर्षी मात्र दिसून आली नाही. कोणत्याच प्रकारचे मंडप, फलक नसल्याने क्रांतिस्तंभ, चवदार तळे या ठिकाणी शुकशुकाट पसरला आहे.

महाडमध्ये राज्यभरातून प्रतिवर्षी लाखो भीमसैनिक येत असतात. या वर्षी कोरोनाचे सावट चवदार तळे स्मृतिदिनावर पडले असल्याने जे भीमसैनिक महाडमध्ये दाखल होतील त्यांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे तसेच आरोग्य विभागाच्या सूचनादेखील पाळल्या पाहिजेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

पोलीस प्रशासनाची तयारी
२० मार्च रोजी महाड क्रांतिभूमीत लाखो भीमसैनिक दाखल होतात, मात्र या वर्षी ही गर्दी दिसून येणार नसली तरी महाड शहर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे.
महाडमध्ये १ पोलीस उपविभागीय अधिकारी, ४ पोलीस निरीक्षक, १६ साहाय्यक पोलीस निरीक्षक, ७० पोलीस, ११ महिला पोलीस कर्मचारी, २४ वाहतूक पोलीस, २ रिझर्व्ह पोलीस तैनात केले आहेत.
येणा-या भीमसैनिकांची गैरसोय होऊ नये, त्यांना लागणारी मदत याकरिता पोलीस दल तैनात केले असल्याचे पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी सांगितले.

Web Title: 93rd anniversary of Chavdar Sarovar satyagraha Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.