रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 06:00 PM2021-06-11T18:00:38+5:302021-06-11T18:17:10+5:30

टप्प्याने अन्य गावांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

251 villages in Raigad are corona free, 13% of citizens are infected with corona | रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

रायगडमधील २५१ गावे कोरोनामुक्त, 13 टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

Next
ठळक मुद्देजिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९१२ महसूली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही

रायगड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार, प्रशासनाने राबवलेल्या उपाय योजना आणि नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कामी आला आहे. रायगड जिल्ह्यातील तब्बल 251 गावे कोरोनाच्या विळख्यातून बाहेर आली आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याचा सरासरी प्रमाणात आता घट झाली आहे. सध्या 13 टक्के नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे.

जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोनामुक्त होत आहेत. जिल्ह्यातील १ हजार ९१२ महसूली गावांपैकी २५१ गावे कोरोनामुक्त झाली असून, या गावांमध्ये सद्यस्थितीत एकही कोरोना रुग्ण नाही. जिल्ह्यासाठी ही आशादायक चित्र आहे. रायगड जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत.‌ सुरुवातीला पनवेल महानगर पालिका हद्दीत कोरोना रुग्ण आढळले. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काेराेना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली.  ग्रामीण भागातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे प्रशासनासमोर आव्हान आहे. यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली. सरकारने लागू केलेले निर्बंध तसेच उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजना राबविण्यात आलेल्या आहेत.

प्रशासनाने राबविलेल्या उपाययोजनांना ग्रामीण भागातील नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील गावे टप्प्याटप्प्याने कोरोना मुक्त होत असल्याचे आशादायक चित्र दिसून येत आहे. जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींमध्ये १ हजार ९१२ महसूली गावे आहेत. त्यामधील १६२ ग्रामपंचायतींमधील २५१ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टसिंगचे पालन‌ करावे, वेळोवेळी सॅनिटायजरचा वापर करावा, गरम पाण्याचा वाफारा घ्यावा, गुळण्या कराव्यात, पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, कोरोनाची लक्षणे असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याच्या सरासरी प्रमाणात झाली घट

रायगड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रादुर्भाव रुग्ण सापडण्याचे सरासरी प्रमाण कमी होत असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येते. १५ मे रोजी जिल्ह्यात कोरोना चाचणी केलेल्या नगरिकांपैकी १९.५ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत होते. यामध्ये अत्ता घट झाली हाेत आहे. सध्या तपासणी केलेल्या नागरिकांपैकी १३ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न होत आहे.

ग्रामीण भागात राबविलेल्या उपाययोजना

ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने सुचविलेल्या उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांवर अॅंटीजन चाचणी करण्यात येत आहे. गावोगावी आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून कोरोना लक्षणे आढळणाऱ्यांची अॅंटीजन चाचणी करण्यात येत आहे. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची बाजारपेठ तसेच इतर ठिकाणी अॅंटीजन चाचणी करण्यात येते. या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांवर औषोधपाचार करण्यात येतात. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांच्या अखत्यारीत असलेल्या उपकेंद्रांवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. सरकारने केलेल्या सुचांनाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करण्यात जनतेचा सहभाग महत्वाचा होता. यापुढेही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करुन आपल्या जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करुया. 
नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे.

डॉ. किरण पाटील ( मुख्यकार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद)  

तालुका :    महसूली गावे : कोरोनामुक्त गावे
अलिबाग :        २२२ : ०
पेण :             १५६ : ०
पनवेल : १४७ : १०
उरण : ६३ : ०
कर्जत : १७८ : ५
खालापूर : १३६ : ४०
सुधागड : १०० : २९
रोहा : ७३ : २२
मुरुड : १७० : ७
म्हसळा : १८२ : १९
श्रीवर्धन : ५८ : १३
माणगांव : ८० : ४९
तळा : ७८ : ११
महाड : १८३ : २९
पोलादपूर : ८६ : १७
एकूण : १९१२ : २५१
 

Web Title: 251 villages in Raigad are corona free, 13% of citizens are infected with corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.