२२ कोटींची कामे रखडली
By Admin | Updated: August 8, 2015 22:08 IST2015-08-08T22:08:58+5:302015-08-08T22:08:58+5:30
दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक

२२ कोटींची कामे रखडली
महाड : दुर्गम गावे मुख्य रस्त्यांशी जोडावी या उद्देशाने सुरू झालेली पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर झालेल्या रायगड जिल्ह्यातील ९ रस्त्यांची कामे निधीअभावी रखडल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अपुरा निधी मिळाल्यामुळे या योजनेतील सुमारे २२ कोटी रु. पेक्षा अधिक कामे आज ठप्प झालेली आहेत. या योजनेच्या टप्पा दोनसाठी केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१४ पासून निधीच उपलब्ध करून न दिल्यामुळे ठेकेदारांपुढे कामे पूर्ण कशी करायची, असा प्रश्न पडला आहे. तर स्थानिक ग्रामस्थांनाही रस्त्याचे काम रखडल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे.
अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाच्या काळात ही पंतप्रधान ग्रामसडक योजना केंद्र सरकारने सुरू केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये पाचशे लोकसंख्येवरील मुख्य रस्त्याला न जोडलेली गावे जोडणे, त्यापाठोपाठ पाचशे ते एक हजार लोकसंख्या असलेली गावे मजबूत रस्त्यांनी जोडणे असा कार्यक्रम या योजनेत राबविण्यात आला. या योजनेचा फायदा अनेक गावांना झाला. त्यानंतर टप्पा दोन अंतर्गत रस्त्याची सुधारणा करण्याची कामे या योजनेत राबविण्यात आली. या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेली रस्त्याची कामे समाधानकारक तसेच दर्जेदार असल्याचेही निदर्शनास आले. ही योजना नोव्हेंबर २०१४ पर्यंत व्यवस्थित सुरू होती. मात्र त्यानंतर या योजनेसाठी उर्वरित निधीच येणे बंद झाल्यामुळे या योजनेंतर्गत जिल्ह्यात सुरू असलेली रस्त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात निधीअभावी या योजनेतील नऊ कामे ठप्प झाली असून, आज ना उद्या या केलेल्या कामांना निधी येईल, या आशेवर ठेकेदारांनी सुमारे ७० ते ८० टक्के कामे केली आहेत. परंतु आता ठेकेदारांनीही हात टेकले आहेत. सुरुवातीला पाच ते पंचवीस लाख रुपयांचा निधी काम सुरू करण्यासाठी मिळाला. मात्र त्यानंतर केंद्र शासनाने निधी देणेच बंद केल्याने ही कामे आज रखडली आहेत. यासाठी निधी मिळावा अशी अपेक्षा ग्रामस्थांना आहे. (वार्ताहर)