रायगड जिल्हा परिषदेतील १६४ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात; प्रमाणपत्र, ‘यूडीआयडी’ची ठाण्यात फेरतपासणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 09:44 IST2026-03-10T09:43:39+5:302026-03-10T09:44:17+5:30
राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि यूडीआयडी कार्ड फेरतपासणी केली जात आहे.

रायगड जिल्हा परिषदेतील १६४ दिव्यांग कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात; प्रमाणपत्र, ‘यूडीआयडी’ची ठाण्यात फेरतपासणी
अलिबाग : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून पदभार घेतल्यानंतर आक्रमक पवित्रा घेतला आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय विभागातील दिव्यांग प्रमाणपत्रांची चौकशी आणि यूडीआयडी कार्ड फेरतपासणी केली जात आहे. मुंढे यांच्या आदेशानंतर दिव्यांग कल्याण विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना व्यापक पडताळणीचे निर्देश दिले आहेत. रायगड जिल्हा परिषदेतील ३१८ दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता १६४ जण संशयाच्या भोवऱ्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे येथे या कर्मचाऱ्यांची फेरतपासणी केली जाणार आहे.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेक जणांनी शासकीय नोकरी मिळवली आहे. त्यामुळे खरे दिव्यांग नोकरीपासून वंचित राहिले आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्यात दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू झाली आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या विविध विभागांत ३१८ दिव्यांग कर्मचारी सेवेत आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांची पडताळणी झाली. जिल्हा रुग्णालयात आरोग्य अधिकारी यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांची तपासणी करून अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला. यामध्ये १६४ दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत संशय निर्माण झाला होता. त्यामुळे १६४ जणांची फेरतपासणी ठाणे येथील आरोग्य उपसंचालक कार्यालयात केली जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
कारवाईची टांगती तलवार
राज्यात सांगली येथे जिल्हा परिषदेच्या १३ शिक्षक आणि एक कर्मचारी यांनी कागदपत्रे सादर न केल्याने तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या संशयित १६४ जणांवर ही कारवाईची टांगती तलवार उभी आहे. ठाणे येथून अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. फेरतपासणीच्या निर्णयामुळे जिल्हा परिषदमध्ये खळबळ उडाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या १६४ दिव्यांग कर्मचाऱ्यांबाबत संशय निर्माण झाल्याने त्यांच्या कागदपत्राची फेरतपासणी करण्यासाठी ठाणे येथे पाठविण्यात आले आहे. काही जणांनी ठाणे येथे जाऊन फेरतपासणी केली आहे, मात्र त्याबाबत अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही आहे.
नेहा भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रायगड