सासवड : मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल चार वर्षांहून अधिक कालावधीनंतर होणार असल्याने पुरंदर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. निवडणुकांची तयारी सुरू झाल्याने इच्छुक उमेदवारांकडून मोर्चेबांधणी, मतदारांशी संपर्क आणि शक्तिप्रदर्शनाला वेग आला आहे. देवदर्शन, बैलगाडा शर्यती, होम मिनिस्टर कार्यक्रम, गडकिल्ले भेटी, क्रीडा व कुस्ती स्पर्धांच्या माध्यमातून अनेकांनी प्रचाराची सुरुवात केली आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे चार गट आणि पंचायत समितीचे आठ गण आहेत. तालुक्याचे आमदार शिवसेना (शिंदे गट)चे विजय शिवतारे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर काँग्रेसमधून भाजपत गेलेले माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजपनेही जोरदार तयारी सुरू केली आहे. सासवड नगरपालिकेवर भाजपने मिळवलेल्या विजयामुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
दरम्यान, विस्कळीत असलेला राष्ट्रवादी (अजित पवार गट) ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसशी (शरद पवार गट) हातमिळवणी करत जेजुरी नगरपालिकेत सत्तेवर आल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तरी ही निवडणूक भाजप आणि शिवसेना यांच्यातील थेट द्वंद्व म्हणून रंगण्याची चिन्हे आहेत. मात्र राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची भूमिका अजूनही गुपित असून, त्यांच्याकडूनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.
यामुळे शिंदेसेना, भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात निवडणुकीचा मुख्य फड रंगणार आहे. काँग्रेस, उद्धवसेना, मनसे, आम आदमी पक्ष तसेच अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरण्याची शक्यता असली तरी त्यांच्या ताकदीमुळे निवडणुकीत फार मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता कमी मानली जात आहे.
दिवे–गराडे गटात महिलांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेच
दिवे–गराडे हा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव गट आहे. विद्यमान सदस्य ज्योती झेंडे पुन्हा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. या गटातून गौरी कुंजीर, संगीता काळे, वृषाली काळे, गीतांजली ढोणे, प्रतिभा कदम यांची नावे चर्चेत आहेत. भाजप नेते बाबाराजे जाधवराव यांची कन्या उदयानी जाधवराव, माजी तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांची कन्या दिव्या जगदाळे तसेच आमदार बापू पठारे यांची कन्या रूपाली अमोल झेंडे-पठारे यांचीही जोरदार चर्चा सुरू आहे.
नीरा-कोळविहिरे गटाकडे सर्वांचे लक्ष
नीरा-कोळविहिरे गट इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असून, हा गट परंपरेने राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मागील निवडणुकीत शिवसेनेने येथे वर्चस्व प्रस्थापित केले होते. या गटातून माजी आमदार अशोक टेकवडे यांच्या सून सानिका टेकवडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांची कन्या डॉ. प्राजक्ता दुर्गाडे, तेजश्री काकडे, सुजाता दगडे, सम्राज्ञी लंबाते यांनी संपर्क वाढवला आहे. निरेतील चव्हाण कुटुंबाकडूनही चाचपणी सुरू आहे.
बेलसर-माळशिरस गटात ‘हायव्होल्टेज’ लढतीची चिन्हे
सर्वांसाठी खुला असलेला बेलसर-माळशिरस गट हा हायव्होल्टेज ठरण्याची शक्यता आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरंगे पुन्हा निवडणूक लढवू शकतात. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे वरिष्ठ नेते विजय कोलते यांचे चिरंजीव गौरव कोलते, माऊली यादव यांनी प्रचार सुरू केला आहे. याशिवाय अमोल कामठे, बाळासाहेब कामठे, रमेश इंगळे, कैलास कामठे, बाळासाहेब कोलते, माणिक निंबाळकर, गणेश मुळीक यांचीही नावे चर्चेत आहेत.वीर-भिवडी गट शिंदेसेनेचा बालेकिल्ला
वीर-भिवडी गट शिंदेसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. या गटातून तालुका प्रमुख हरिभाऊ लोळे, तान्हाजी उर्फ पिनूशेठ काकडे, शैलेश तांदळे, समीर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य बबूसाहेब माहूरकर, पुष्कराज जाधव, राहुल गायकवाड, भूषण ताकवले यांची जोरदार चर्चा सुरू आहे. एकूणच, पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका राजकीय प्रतिष्ठेची लढाई ठरणार असून, येत्या काळात उमेदवार निश्चिती आणि युती-आघाड्यांमुळे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.
Web Summary : Purandar's Zilla Parishad election sees a four-way contest. Shiv Sena, BJP, and both NCP factions gear up. Key candidates are vying for seats in Dive-Garade, Neera-Kolvihire, Belser-Malshiras and Veer-Bhivadi.
Web Summary : पुरंदर जिला परिषद चुनाव में शिवसेना, भाजपा और दोनों एनसीपी गुटों के बीच मुकाबला है। दिवे-गराडे, नीरा-कोळविहिरे, बेलसर-मालशिरस और वीर-भिवडी में प्रमुख उम्मीदवार सीटों के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं।