प्रॉपर्टीच्या वादातून तरूणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 11:36 AM2019-12-09T11:36:27+5:302019-12-09T11:36:39+5:30

अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कदम करीत आहेत.

Young man stoned to death by property dispute | प्रॉपर्टीच्या वादातून तरूणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

प्रॉपर्टीच्या वादातून तरूणाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

googlenewsNext

पुणे : विकसनासाठी दिलेल्या सामूहिक जागेतील व्यवहार मान्य नसल्याने झालेल्या वादातून चुलत भावानेच भावाचा दगडाने  ठेचून खून केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री विश्रांतवाडीत घडला. विवेक बाळासाहेब पंचमुख (वय ३०, रा. जनार्दननगर,  लोहगाव) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी आनंद नामदेव पंचमुख (वय ३२, रा. शांतीनगर, विश्रांतवाडी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक अरूण आव्हाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या आळंदी रस्त्यावर 'एसआरएस्किम'समोर रविवारी रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास एक जण गंभीर जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक रविंद्र कदम व पथकाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता एक जण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. त्याला तात्काळ उपचारासाठी ससून रूग्णालयात पाठवण्यात आले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विवेक पंचमुख याने  त्याचे गावी रांजणगाव येथील २०१४ मध्ये  भावकीचे  सामाईक क्षेत्र सर्वांच्या संमतीने  विकसनासाठी दिले होते. त्याची नोंद रांजणगाव तलाठी कार्यालयात झाली आहे. मात्र अद्याप काम सुरू न झाल्यामुळे भावकीतील चुलत भाऊ आनंद पंचमुख हा विरोध करत होता. या व्यवहारातील विरोधातून त्याने  विवेक याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रविवारी संध्याकाळी सहा वाजता आनंद याने विवेक याला शांतीनगर येथे बोलावले. याच विषयावरून झालेल्या वादातून आनंद याने साथीदारांच्या मदतीने विवेक याचा लोखंडी रॉड व दगडाने ठेचून निर्घृण खून केला. या प्रकारानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत.

घटनास्थळी पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानवरू, सहाय्यक पोलिस आयुक्त मच्छिंद्र बोराटे, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अंजुम बागवान यांनी भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या. विवेक हा जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करीत असे. येरवडा व लोहगाव परिसरात सामाजिक उपक्रमात तो नेहमी सहभागी होता. त्याच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी व दोन लहान मुले असा परिवार आहे. या निर्घृण खुनाच्या घटनेमुळे विश्रांतवाडी परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. विश्रांतवाडी सह गुन्हे  शाखेची पथके आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. अधिक तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कदम करीत आहेत.

Web Title: Young man stoned to death by property dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.