पुणे: स्वच्छतेच्या वेगवेगळ्या उपक्रमांसाठी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसह इंदुर शहराचा दौरा केलेल्या आमदार हेमंत रासने यांनी नुकताच मतदारसंघात किंवा शहरात कुठेही फ्लेक्स लावणार नसल्याचा संकल्प व्यक्त केला. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे राज्य प्रवक्ता, माजी महापौर अंकूश काकडे यांनी, तुम्ही नाही लावणार फ्लेक्स, पण तुमच्या कार्यकर्त्यांचे व दुसऱ्या आमदारांचे काय? असा प्रश्न करत त्यांनाही तुम्ही काही सुचना द्या असा उपरोधिक सल्लाही दिला आहे.
कसब्याचे भारतीय जनता पक्षाचे आमदार रासने यांनी अलीकडेच महापालिकेच्या १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना बरोबर घेत इंदुर शहराचा दौरा केला. स्वच्छतेबाबत महापालिकेने तिथे राबवलेल्या अनेक उपक्रमांची माहिती घेत त्यांनी त्यापासून प्रेरणा घेतली. नुकतीच त्यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत शहरात आपण कुठेही कसलेही फ्लेक्स लावणार नसल्याचे जाहीर केले. या फ्लेक्समुळे शहराचे विद्रुपीकरण होते, व ते थांबावे अशी आपली इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.
काकडे यांनी यावर त्यांचे अभिनंदन केले. तुम्ही निर्णय घेतलात, तो जाहीर केलात हे स्वागतार्ह आहे, मात्र तुमचे कार्यकर्ते फ्लेक्स लावणारच, त्याचबरोबर तुमच्या पक्षाचे अन्य आमदार, त्यांचे कार्यकर्तेही त्यापासून थांबणार नाहीत, त्यामुळे त्यांनाही याबाबत काही सांगा, सुचना करा व त्यांच्याकडूनही शहराची विद्रुपीकरण होणार नाही याकडे लक्ष द्या असे काकडे यांनी म्हटले आहे.
दरम्यान शहरात मोक्याच्या ठिकाणी भलेमोठे रंगीत फ्लेक्स लावण्याचे पेव फुटले आहे. त्यातही चौकांमध्ये, महत्वाच्या, गर्दीच्या रस्त्यांवर नेत्यांच्या स्वागताचे मोठमोठी छायाचित्रे असलेले फ्लेक्स लावलेले असतात. त्यावर सातत्याने टीका होत असूनही महापालिका प्रशासनाकडून त्यावर कायमस्वरूपी कारवाई केली जात नाही. अनेक नागरिकांकडून यावर नाराजी व्यक्त केली जात असते.