चिंताजनक! पिंपरीत १४ दिवसानंतरच्या उपचारानंतरही ‘त्या ’कोरोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 13:21 IST2020-04-16T13:20:50+5:302020-04-16T13:21:40+5:30
आजपर्यंत शहरातील ४८जणांना कोरोनाची लागण

चिंताजनक! पिंपरीत १४ दिवसानंतरच्या उपचारानंतरही ‘त्या ’कोरोनाबाधित रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
पिंपरी: दिल्लीतीली तबलिगीच्या कार्यक्रमातून आलेल्या कोरोना बाधित रुग्णाने १४ दिवसांचे उपचार घेतल्यानंतरही त्याचा दुसरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे चिंता मात्र वाढली आहे. तसेच भोसरी परिसरातील आणखी एका पुरुष रुग्णाचे रिपोर्ट रात्री उशीरा पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे. तर, आजपर्यंत शहरातील ४८जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी १२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील तबलिगी मरकजमधील धार्मिक कार्यक्रमांतून पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या २३ आणि त्यांच्या संपर्कातील पाच नातेवाईक अशा २८ जणांपैकी २ जणांचे रिपोर्ट २ एप्रिल रोजी 'पॉझिटीव्ह' आले होते. त्यानंतर त्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
यातील एक रुग्ण दक्षिण आफ्रिका, दिल्ली, मुंबईमार्गे व्हाया पुणे असा प्रवास करुन आला होता. त्यानंतर या रुग्णाने शहरातील थेरगाव, खराळवाडी भागात प्रवास केला होता. या कोरोना बाधित रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचाराला १४ दिवस पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने या रुग्णाचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविले. परंतु, दुस-या चाचणीतही हा रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टमध्ये भोसरी परिसरातील आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील हा रुग्ण आहे. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे.
...........