विश्व पंजाबी संमेलन पुण्यात
By Admin | Updated: February 16, 2016 01:10 IST2016-02-16T01:10:34+5:302016-02-16T01:10:34+5:30
घुमान येथे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून झालेला मराठी आणि पंजाबी भाषेचा संगम रसिकांसाठी ऐतिहासिक पर्वणी देणारा ठरला

विश्व पंजाबी संमेलन पुण्यात
पुणे : घुमान येथे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून झालेला मराठी आणि पंजाबी भाषेचा संगम रसिकांसाठी ऐतिहासिक पर्वणी देणारा ठरला. याच संत नामदेवांच्या कर्मभूमीत ‘विश्व पंजाबी साहित्य संमेलन’ महाराष्ट्रात घेण्यासाठीचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. मात्र, वर्षभरात काहीच हालचाल न झाल्याने सरहद संस्था व शीख समाजाने हे संमेलन आता पुण्यात करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत.
गुरू गोविंदसिंग यांच्या ३५०व्या जयंतीचे औचित्य साधून नोव्हेंबर महिन्यात हे संमेलन पुण्यात घेण्यात येणार आहे. संत नामदेव महाराजांच्या कर्मभूमीत मागील वर्षी सरहद संस्था आणि पंजाब सरकारच्या पुढाकारातून ८८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. पंजाबी जनतेच्या प्रेमाने समस्त मराठी रसिक भारावल्याने महाराष्ट्रात पंजाबी संमेलन घ्यावे, अशी सूचना शरद पवार यांनी केली. त्यास संमती देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हे संमेलन नागपूर येथे घेतले जाईल, अशी तयारी दर्शवली होती. सरकारी पातळीवर काहीच हालचाल न झाल्याने यासाठी सरहदनेच पुढाकार घेतला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार यांच्याशी पत्रव्यवहार झाला आहे. सरकारने सहभाग घेतल्यास आनंद होईल, असेही सरहदचे अध्यक्ष संजय नहार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)