गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण; पण मुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 11:38 IST2025-08-05T11:38:17+5:302025-08-05T11:38:38+5:30
निश्चित केलेल्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण न झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता

गणेशखिंड रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाचे काम पूर्ण; पण मुख्यमंत्र्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळेना
पुणे: गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळे काम पूर्ण होऊनही उड्डाणपूल वाहतुकीसाठी काही दिवस खुला होणार नाही.
गणेशखिंड रस्त्याने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम केले जात आहे. या मेट्रो प्रकल्पासाठी गणेशखिंड रस्त्यावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील आनंदऋषीजी चौकात दुमजली उड्डाणपूल उभारला जात आहे. या ठिकाणी असलेला उड्डाणपूल २०२० मध्ये पाडण्यात आल्यानंतर ‘पुणे एकिकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या’ (पुम्टा) बैठकीत हा दुमजली पूल २०२४ पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. निश्चित केलेल्या कालावधीत पुलाचे काम पूर्ण न झाल्याने औंध, बाणेर, बालेवाडी, पाषाणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता.
या पुलाच्या कामामुळे होत असलेल्या वाहतूककोंडीनंतर हे काम तातडीने पूर्ण करून जून २०२५ पर्यंत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही अडचणी आल्याने या कामाला उशीर झाला आहे. गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या दुमजली उड्डाणपुलाचे काम येत्या चार ते पाच दिवसांत पूर्ण होणार आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी वेळ मिळत नाही.