DJ च्या कर्कश आवाजामुळे महिलेचा गेला जीव?; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 23:39 IST2026-03-27T23:38:22+5:302026-03-27T23:39:51+5:30
डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे आईला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप जाधव यांचा मुलगा सौरभ यांनी केला आहे.

DJ च्या कर्कश आवाजामुळे महिलेचा गेला जीव?; हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
पुणे - आवाजाची पातळी ओलांडून सुरू असलेल्या डीजेच्या अति आवाजामुळे ससाणेनगर येथील एका महिलेचा जीव गेला आहे. श्रीराम जन्मोत्सवाची डीजेच्या तालावरील मिरवणूक पाहायला गेलेल्या रंजना रवींद्र जाधव (वय-६५, रा. गल्ली क्र. १२, ससाणेनगर) या महिलेचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ससाणेनगर येथे रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. डीजेच्या अति आवाजामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप संबंधीत महिलेच्या मुलाने केला आहे.
ससाणेनगर येथील मुख्य रस्त्यावर गुरुवारी मंडळांनी राम जन्मोत्सव सोहळा मिरवणुकीचे आयोजन केले होते. मिरवणुकीसाठी ध्वनीवर्धक म्हणून डीजेचा वापर करण्यात आला होता. ही मिरवणूक पाहण्यासाठी घरातील काही कामे उरकून रंजना जाधव या रस्त्यावर आल्या होत्या. थोड्याच वेळात त्यांना छातीत दुखू लागल्याने त्या ओरडून खाली कोसळल्या. धनिवर्धकाच्या आवाजामुळे त्यांच्या आवाजाकडे कुणाचेही लक्ष गेले नाही.
त्या जेंव्हा खाली कोसळल्या त्यावेळी सोबतच्या महिलांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने हालचाल करून जाधव यांना ऑटो रिक्षात बसविले मात्र, मिरवणुकीमुळे वाहतूक कोंडी झाल्याने ऑटो रिक्षा रुग्णालयात जाण्यासाठी खूप वेळ गेला. रुग्णालयात तपासणी केली असता त्यांचे रुग्णालयात आणण्यापूर्वीच हृदयविका निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. श्रीमती जाधत लष्कराच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग (सीएमई) मधून निवृत्त झालेल्या आहेत.
दरम्यान, डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे आईला त्रास होऊन तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप शजाधव यांचा मुलगा सौरभ यांनी केला आहे. या ठिकाणी पोलीस असूनही आवाजावर नियंत्रण नव्हते. याशिवाय आईला त्रास झाल्यानंतर मिरवणुकीमुळे झालेल्या वाहतूक कोंडीतून तिला रुग्णालयात नेईपर्यंत मोठा वेळ गेल्यानेही तिचा मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. याबाबत काळे पडळक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.त्यामुळे पुढील कारवाई बाबत समजू शकले नाही.